सांगेतील विजयी उमेदवार सुभाष फळदेसाई यांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी /सांगे
सांगेतील साळावली धरणाच्या बाजूच्या जमिनीमध्ये कापड उद्योग प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार, अशी माहिती विजयी उमेदवार सुभाष फळदेसाई यांनी सांगे बसस्थानकावर झालेल्या मिरवणुकीच्या समारोप कार्यक्रमात बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, प्रभारी गणपत नाईक, रिवणचे सरपंच सूर्या नाईक, संजय रायकर, नगराध्यक्ष कॅरोज प्रुझ, उगेचे सरपंच उदय देसाई, प्रीती नाईक, संतिक्षा गडकर, इक्बाल सय्यद, अलका फळदेसाई व इतर मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना फळदेसाई म्हणाले की, सांगे मतदारसंघातील ऊस उत्पादकांच्या समस्या, धरणग्रस्तांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. साळावली धरणाचे पाणी अजूनही सांगे मतदारसंघाच्या ग्रामीण भागांत पोहोचलेले नाही. यावरही तोडगा काढणार. या निवडणुकीत भाजप मंडळ सोडून गेले. त्याचा कोणताही फटका पक्षाला बसला नाही. याउलट प्रत्येक बुथावर जास्त मते भाजपाला मिळाली. आपल्या विजयासाठी अहोरात्र झटलेल्या कार्यकर्त्यांमुळेच आपला विजय झाला, असे ते म्हणाले.
या निवडणुकीत विरोधकांनी मोठय़ा प्रमाणात पैशांचा वापर केला. पण सांगे मतदारसंघातील मतदार पैशांच्या आमिषाला बळी पडले नाहीत. ते ठामपणे भाजपाच्या पाठिशी राहिले, असे वासुदेव मेंग गावकर म्हणाले. सरपंच सूर्या नाईक म्हणाले की, स्व. पांडू वासू नाईक वगळता या मतदारसंघाच्या कुठल्याही आमदाराला मंत्रिपद बहाल करण्यात आले नाही. फळदेसाई हे दुसऱयांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तेव्हा त्यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.









