प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने खानापूर रोड येथील मराठा मंदिरमध्ये सुरू असलेल्या संगीत भजन स्पर्धेची शुक्रवारी उत्साहात सांगता झाली. पाच दिवसांच्या स्पर्धा कालावधीत 31 महिला-पुरुष भजनी मंडळांनी एकापेक्षा एक सुंदर भजने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. शिवाय मान्यवरांच्या हस्ते महिला-पुरुष गटातील विजेत्या प्रत्येकी दहा क्रमांकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर वारकरी महासंघाचे अध्यक्ष हभप भाऊसाहेब पाटील, शंकर बाबली, वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव यासह मान्यवर उपस्थित होते. नेताजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी हभप भाऊसाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
वाचनालयातर्फे घेण्यात येणाऱया भजन स्पर्धेसाठी पुरुष गटामध्ये 17 तर महिला गटामध्ये 16 अशा एकूण 33 भजनी मंडळांनी नोंद केली होती. त्यापैकी 31 भजनी मंडळांनी आपली कला उत्स्फूर्तपणे सादर केली. यावेळी महिला आणि पुरुष अशा प्रत्येक गटासाठी अनुक्रमे पहिले बक्षीस 11 हजार, दुसरे 8 हजार, तिसरे 6 हजार, चौथे 4500, पाचवे 3500, सहावे 3 हजार, सातवे 2500, आठवे 2 हजार, नववे 1500, उत्तेजनार्थ 1500 रुपये यासह उत्कृष्ट मृदंग, तबला, पेटीवादक आणि गायकांना प्रत्येकी 1 हजार रुपये रोख देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे संपूर्ण परीक्षण प्रभाकर शहापूरकर व सीमा कुलकर्णी यांनी केले. तर निवेदक म्हणून विजय बांदिवडेकर यांनी काम पाहिले.
याप्रसंगी उपाध्यक्ष प्रसन्ना हेरेकर, कार्यवाह रघुनाथ बांडगी, सहकार्यवाह लता पाटील, सुनीता मोहिते, अनंत लाड, गोविंदराव राऊत, डॉ. विनोद गायकवाड यासह पदाधिकारी, महिला-पुरुष वारकरी मंडळ यासह रसिक आणि वारकरी उपस्थित होते..









