प्रतिनिधी/ कराड
माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत येथील नगरपालिकेने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी प्रथमच सायकल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. यात मोठय़ा गटातील 30 किलोमीटरच्या स्पर्धेत अश्विन मर्डेकर याने प्रथम क्रमांक मिळवला. याच गटात जॉर्ज थॉमसने दुसरा तर सिद्धार्थ पाटीलने तिसरा क्रमांक मिळवला. मोठय़ा गटासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ ते कोळे व तेथून परत समाधीस्थळ असे 30 किलोमीटरचे अंतर होते.
लहान गटासाठी 10 किलोमीटरचे समाधीस्थळ ते ढेबेवाडी फाटा ते समाधीस्थळ असे अंतर होते. यात साईराज कदम, श्रीगणेश जमदाडे, शार्दुल निकम यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. महिला गटासाठी 10 किलोमीटरचे अंतर होते. या गटात सुमारे 40 महिलांनी सहभाग घेतला. यात प्रज्ञा लाड, मधुरा रावत, सिमरन तलरेजा यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. एकुण 200 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती महेश कांबळे, गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक हणमंत पवार, मोहसीन आंबेकरी, नगरसेविका विद्या पावसकर, मुख्याधिकारी रमाकांत डाके, नोडल ऑफिसर रफीक भालदार, मिलिंद शिंदे, अख्तर आंबेकरी, उमेश शिंदे, एन्व्हायरो क्लबचे प्रा. जालिंदर काशिद यांच्या हस्ते समाधीस्थळी प्रारंभ झाला.
या स्पर्धेसाठी पालिकेने जय्यत तयारी केली होती. स्पर्धा मार्गावर ठिकठिकाणी पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. स्पर्धा संपल्यानंतर समाधीस्थळी बक्षीस वितरण करण्यात आले. पहिल्या तीन क्रमांकांना 7 हजार, 5 हजार, 3 हजार व उत्तेजनार्थ 1 हजाराची दोन बक्षिसे देण्यात आली. प्रशस्तीपत्र, टिशर्ट, मेडलही देण्यात आले. कराडकर नागरिक, महिला व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेस चांगला सहभाग घेतला होता.
मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या पत्नी व मुलानेही 10 किलोमीटरचे अंतर सायकलवरून पार केले. डाके म्हणाले की, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी व सायकल वापराचा संदेश देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. भविष्यात राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याचा मानस आहे.









