इस्रायल-हमास संघर्षाला वेगळे वळण, ओलीसांच्या सुटकेचा प्रयत्न वेगवान
वृत्तसंस्था / जेरुसलेम
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष आता सातव्या आठवड्यात पोहचला असून तो आणखी अनेक आठवडे चालण्याची शक्यता आहे. सध्या इस्रायलची सेना गाझा पट्टीत असून अनेक स्थानी तिचे हमासच्या दहशतवाद्यांशी हातघाईचे युद्ध सुरु आहे. या युद्धात इस्रायलची हळूहळू सरशी होत असल्याचे दिसत असून हमासचा शस्त्रसाठा आणि दहशतवाद्यांची कुमक कमी होताना दिसत आहे.
दुसरीकडे अमेरिकेच्या पुढाकाराने संघर्षावर तोडगा काढण्याचेही प्रयत्न सामोपचाराच्या मार्गाने होत आहेत. कतारच्या मध्यस्थीने हमासशी संपर्क साधण्यात आला असून सर्व 246 ओलीसांच्या सुटकेचे प्रयत्न होत आहे. दोन्ही बाजू तोडगा काढण्याच्या अगदी जवळ पोहचल्या आहेत, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
युद्ध सुरुच
इस्रायलने गाझा पट्टीच्या उत्तर भागात मोठी मजल मारली असून हमासची अनेक केंद्र आणि शस्त्रसाठे उध्वस्त केले आहेत. हमासची अनेक कार्यालयेही ताब्यात घेण्यात आली आहेत. अल शिफा रुग्णालयात इस्रायलच्या सैनिकांनी ठाण मांडले असून हमासच्या अनेक भुयारांचा शोध लागला आहे. इस्रायलवर ज्या भागातून अग्निबाण हल्ले होत होते, ती स्थाने आता इस्रायली सेनेच्या नियंत्रणात आहेत. शस्त्रसंधी झाल्यास ती केवळ पाच दिवसांची असेल. त्या कालावधीत सर्व ओलिसांची विनाअट सुटका न झाल्यास युद्धाची पुढची पातळी गाठली जाईल, असा स्पष्ट इशारा इस्रायलच्या सेनेने दिला आहे. हमासला आता ही शेवटची संधी आहे. नंतर त्याचा सर्वनाश अटळ आहे, असाही इशारा देण्यात आला आहे.
रुग्णालयावर हल्ला
इस्रायलने हमासचे केंद्र असण्याचा संशय असलेल्या आणखी एका रुग्णालयावर हल्ला केला असून त्यात 12 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मृतांमध्ये काही रुग्ण आहेत. या रुग्णालयातून इस्रायलच्या सैनिकांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. रुग्णालयात 700 जण असून त्यांचा जीव धोक्यात आहे, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
मृतांची संख्या 14 हजारपर्यंत
या संघर्षात आतापर्यंत पॅलेस्टाईनमधील मृतांची संख्या 13 हजार 700 हून अधिक झाली असून ती आता 14 हजारचा आकडा पार करण्याच्या बेतात असल्याचे पॅलेस्टाईनच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मृतांमध्ये 6 हजार बालके आणि 3,500 महिलांचा समावेश असल्याचीही माहिती देण्यात आली.
हमासचा दावा
इस्रायलची पूर्वीची राजधानी तेल अवीववर अनेक अग्निबाण सोडण्यात आल्याचा दावा हमासकडून करण्यात आला. मात्र, बरेचसे अग्निबाण वाया गेल्याचेही दिसून येत आहे. इस्रायलच्या आयर्न डोम व्यवस्थेने यांपैकी बहुतेक अग्निबाण निष्प्रभ केल्याचीही माहिती देण्यात आली. या हल्ल्यात इस्रायलची कोणतीही हानी झाली नाही. उलट इस्रालयच्या प्रतिहल्ल्यात पॅलेस्टाईनचे मोठे नुकसान झाले आहे.
इस्रायलचा राजदूत माघारी
दक्षिण आफ्रिकेने या युद्धावर विचार करण्यासाठी ब्रिक्सची ऑनलाईन बैठक बोलाविली आहे. या हालचालींच्या निषेधार्थ इस्रायलने आपला राजदूत चर्चेसाठी दक्षिण आफ्रिकेतून माघारी बोलावला आहे. दक्षिण आफ्रिकेने नुकतीच इस्रायलवर टीका केली होती. इस्रायलकडून या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले होते.
लेबेनॉनवर हल्ले
लेबेनॉनस्थित हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने उत्तर इस्रायली सेनेवर तीन रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रांचा हल्ला सोमवारी केला. त्याला इस्रायलने चोख प्रत्युत्तर दिले. इस्रायलच्या हल्ल्यात काही दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे अद्यापही संघर्ष सुरु असल्याचेच स्पष्ट होत आहे.









