20 हजार चौ.मी. जमिनीत यशस्वीरित्या भाजी लागवड : शेळपे सत्तरी येथील 20 शेतकऱयांचा आदर्श : कृषी अधिकाऱयांची महत्त्वपूर्ण भूमिका
उदय सावंत / शेळपे
गेल्या अठरा वर्षांपासून पडिक असलेल्या शेतजमिनीमध्ये सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून खोतोडा पंचायत क्षेत्रातील शेळपे गावातील एकूण 18 शेतकरी बांधवांनी आदर्श निर्माण केला आहे. वाळपई विभागीय कृषी खात्याच्या अधिकाऱयांच्या प्रोत्साहनामुळे हा प्रयोग यशस्वी झाल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.
कृषी खात्यातर्फे सामूहिक शेतीची पद्धत विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी एकसंघ होऊन आपल्या शेतीमध्ये विविधे उत्पादन घ्यावे यासाठी सरकारतर्फे अनुदानाची योजना जाहीर करण्यात आली. मात्र या योजनेचा फायदा सध्यातरी राज्यातील अवघ्याच शेतकरी बांधवांनी घेतला आहे.
18 शेतकरी बांधव एकसंघ….
शेळपे गावातील शेतकऱयांनी एकसंघ होऊन गेल्या 18 वर्षांपासून पडिक असलेल्या जमिनीमध्ये अनेक पीक घेत हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. शेतकरी बांधव विठोबा गावकर यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून पडिक असलेल्या जमिनीमध्ये घेण्याचे प्रयत्न केले मात्र या प्रयत्नांना यश आले नव्हते. आर्थिक व इतर साधन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे इच्छा असूनही पडिक शेती पुनर्जिवित करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. शेवटी विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस, साहाय्यक कृषी अधिकारी रणजीत म्हापसेकर व खात्याच्या विविध कर्मचाऱयांनी सहकार्य केल्यानंतर या जमिनीमध्ये पीक घेण्यासाठी शेतकऱयांनी महत्त्वाची बैठक घेतली. त्यात सामूहिकरित्या शेती करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्या दृष्टीने पावले टाकल्यानंतर अळंसादे पीक घेण्यावर एकमत झाले.
विविध लागवडी…
त्यानंतर सदर जमिनीमध्ये अळसांदे हे प्रमुख पीक घेण्यात आले. त्याचबरोबर तांबडी भाजी, मुळा, भेंडी, वाल, मक्मयाची लागवड करण्यात आली. आतापर्यंत मोठय़ा प्रमाणात अळसांदे पीक गोवा फलोत्पादन महामंडळाच्या दालनामध्ये विक्री केलेले आहेत. यामुळे चांगला नफा झालेला आहे, असे विठोबा गावकर यांनी सांगितले.
एकेकाळी भाताचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात.
सगुण गावकर यांनी सांगितले की, एकेकाळी या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात भाताचे उत्पादन घेण्यात येत होते. मध्यंतरीच्या काळामध्ये याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. या मागची कारणे अनेक असली तरीसुद्धा सदर जमिनीमध्ये पुन्हा एकदा शेतीची पद्धत सुरू करण्यासाठी शेतकरी बांधवांनी एकसंघ होऊन हा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध…
या जमिनीमध्ये पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यानुसार जलसिंचन व कृषी खात्याच्या माध्यमातून चांगला पाण्याचा साठा करण्यात आला आहे. त्यामुळे उत्पादन घेणे सोयीस्कर बनल्याचेही शेतकऱयांनी सांगितले.
रानटी जनावरांचा उपद्रव रोखण्यासाठी तारेचे कुंपण विठोबा गावकर यांनी पुढे सांगितले की, या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात जनावरे आहेत. खास करून गवेरेडे, रानडुकरांचा उपद्रव आहे. यावर नियंत्रण राखण्यासाठी सभोवताली तारेचे कुंपण घालण्यात आलेले आहे. यासाठी कृषी खात्यातील कुंपण योजनेचा लाभ घेण्यात आला. यामुळे सदर जमिनीमध्ये घेण्यात येणाऱया पिकाला कोणताही धोका नसल्याचे त्याने सांगितले.









