कोटय़वधी रुपयांमध्ये होणार आता विक्री
जीवनात स्थितंतर होणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आम्ही एकाच दृष्टीकोनातून गोष्टी पाहून पाहून वैतागून जातो. अशा स्थितीत दृष्टीकोन बदलावा किंवा त्या गोष्टीत बदल घडवून आणावा. एका प्रवासी फेरीबोटला (यार्च) एका व्यक्तीने आलिशान नौकेत बदलले आहे. आता या नौकेकडे पाहून समुद्रात तरंगणारे हॉटेल असल्याचे वाटते.
स्वप्नांचा महाल म्हणा..
154 फूटांची फेरीबोट हाँगकाँगमधील असून अलिकडेच त्याचे रुपडे बदलण्यात आले आहे. या फेरीचे नाव गोल्डन स्टार होते. या फेरीबोटला आलिशान स्वरुप देणारा व्यक्ती स्वतःचे नाव जाहीर करू इच्छित नाही. हा व्यक्ती हंग हॉममध्ये काम करतो आणि रोज याच फेरीबोटने प्रवास करत होता.
2011 मध्ये विक्री
2011 साली या फेरीबोटची विक्री करण्यात आली होती. आता याला एकप्रकारे आलिशान नौकेचे स्वरुप देण्यात आले आहे. यात चार कक्ष असून चित्रपटगृह देखील आहे. फॉर्मल डायनिंग रुम आहे. रुफ टॉप स्पॉट सनबाथिंगची सुविधा असून नौकेवर सोलर पॅनेल (सौरघट) ही बसविण्यात आले आहेत. तसेच याच्यात हाँगकाँगमधील सर्वात मोठा सोफा सेट ठेवण्यात आला आहे.
वातानुकुलन सुविधा
पूर्ण नौकेत एसी (वातानुकुलन) बसविण्यात आले आहेत. तसेच वर्किंग स्पेसही तयार करण्यात आली असून तेथून समुद्राचे मोहक दृश्य पाहता येते. किचन असून तेथे चहुबाजूला खिडक्या आहेत. या फेरीबोटला आलिशान स्वरुप प्रदान करण्यास 18 महिन्यांचा कालावधी लागला असून आता याचे नावही बदलून डॉट ठेवण्यात आले आहे. ही स्वप्नांची नौका आता विक्रीसाठी तयार आहे. याची किंमत 19 कोटी रुपयांच्या आसपास असणार आहे.









