विरोधीपक्षनेते दिगंबर कामत यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी / मडगाव
वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व जैविक विषाणू विषयावरील तज्ञांनी सामुदायिक टेस्टिंग हाती घेणेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्यासाठीचा प्रभावी उपाय असल्याचे स्पष्ट केले आहे. गोवा सरकारने सामाजिक सर्वेक्षणाचा विचार सोडून, ताबडतोब सामाजिक चाचणी हाती घ्यावी जेणेकरुन गोव्यातील कोरोनासंबंधीचे खरे चित्र समोर येण्यास मदत होईल, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानाच्या आदेशानुसार देशात पाळण्यात आलेला 21 दिवसीय देशव्यापी बंदचा कालावधी आता संपत आला आहे. अशावेळी गोवा सरकारने आजपर्यंत ‘कोविड-19’ संबंधी आजपर्यंत किती जणांच्या चाचण्या केल्या व त्यातल्या किती गोव्यात व गोव्याबाहेर करण्यात आल्या याची आकडेवारी देणे गरजेचे आहे. प्रत्येक दिवशी किती चाचण्या करण्यात येतात व एक चाचणी पूर्ण व्हायला किती वेळ लागतो हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
सामुदायिक चाचणी हाती घेण्यासाठी सरकारची कितपत तयारी आहे तसेच सदर चाचणी हाती घेण्यासाठी सरकारकडे आवश्यक मनुष्यबळ आहे का हे सरकारने सांगावे. ठराविक मुदतीत या चाचण्या पूर्ण करणे महत्वाचे असून, त्यासाठी सरकारने कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे का हे स्पष्ट करावे.
आज कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व प्रंटलाईन वर्कसना सरकारने सुरक्षा कवच म्हणजे पर्सनल प्रोटेक्शन इक्मयुपमेंट (पीपीई) पुरविले आहेत का याची माहिती सरकारने जनतेला देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारने आज कोरोनाचा सामना करण्यासाठी विविध इस्पितळे सज्ज असल्याचे म्हटले आहे. परंतु या सर्व इस्पितळांत आवश्यक ती साधन-सामग्री, व्हेंटिलेटर तसेच औषधे पुरविणे महत्वाचे आहे. सरकारने यासंबंधी कोणती पाऊले उचलली आहेत हे कळणे महत्वाचे आहे.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळावर स्पष्टीकरण द्यावे
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. परंतु अजूनही तेथे काम चालू असल्याचे व कोरोनासाठी ते इस्पितळ तयार नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. सरकारने यासंबंधी खुलासा करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
सरकारने सामुदायिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय योग्य विचार न करता घेतला आहे. सदर सर्वेक्षणासाठी जे सरकारी कर्मचारी जातील त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती असून, त्या सर्वांना सुरक्षा कवच (पीपीई) देणे महत्वाचे आहे. त्याच प्रमाणे सदर सर्वेक्षणाला जाणाऱया कर्मचाऱयांना कोरोनीची लागण झाली नसल्याचे तपासणे अत्यंत महत्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.