गुड्सशेड रोड,महाद्वार रोड,शास्त्रीनगर परिसरातील घटनांमुळे नागरिक चिंताग्रस्त
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरातून गेलेल्या नाल्यांच्या काठावरील घरांमध्ये साप शिरण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका व संबंधित विभागाने उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.
गुड्सशेड रोड-शास्त्रीनगर येथे आढळलेल्या अजगराला पकडण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा या परिसरातील घरांमध्ये साप घुसण्याचे प्रकार घडत आहेत. महाद्वार रोड येथील एका घरामध्ये घोणस जातीचा सहा फूट साप आढळून आला. याची माहिती सर्पमित्र राजू फडतरे यांना कळविण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन त्या सापाला पकडण्यात यश मिळविले. त्यानंतर गुड्सशेड रोड-शास्त्रीनगर 4 क्रॉस येथे त्यांनी सुमारे सहा फूटी धामीण पकडली. तसेच रामलिंगखिंड येथे एका घरात शिरलेल्या सापालाही पकडले.
पकडण्यात आलेल्या सापांना त्यांनी सुरक्षित स्थळी सोडून दिले. साप पाहिल्यानंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच त्यांना ठार न मारता सर्पमित्रांच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी सोडण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही राजू फडतरे यांनी केले आहे..









