फिरोज मुलाणी, सातारा
तिसऱ्या दिवशी झालेल्या 61 किलो गादी विभागातील अंतिम फेरीत कोल्हापूर जिल्ह्याचा आंतरराष्ट्रीय युवा मल्ल विजय पाटील याने सोलापूरच्या तुषार देशमुखचा चुरशीच्या लढतीत 8 विरुध्द 7 गुणाधिक्याने पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले तर तुषारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत विजय पाटील याने आबा शेडगे याचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या फेरीत तुषार देशमुख याने साताऱ्याच्या विशाल सुळला नमवून अंतिम फेरीत धडक मारली होती. याच गटात कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या आबा शेडगे याने अमरावतीच्या गोविंद कापडे याचा 12 विरुध्द 0 अशा मोठय़ा गुणाधिक्याने पराभव करून कांस्यपदक पटकावले. तसेच 86 किलो गादी विभागात साताऱ्याच्या विशाल सुळने जळगावच्या करण परदेशीवर मात करून कांस्यपदक जिंकून पदक तालीकेत सातारचे खाते उघडले.
86 किलो गादी विभागातील अंतिम फेरीमध्ये नाशिकच्या बाळू बोडके याने नगरच्या ऋषिकेश लांडेचा एकतर्फी पराभव करून सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. तर ऋषिकेशला रौप्यपदक मिळाले.
याच गटात कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत कोल्हापूर जिल्ह्याच्या किरण पाटीलने साताऱ्याच्या विशाल रांजणेला पराभवाचा धक्का देत कांस्यपदक पटकावले. तर दुसऱ्या कांस्य पदकासाठी पुणे शहरच्या अभिजित भोईर व पुणे जिल्ह्याच्या प्रतिक जगताप यांच्यात झाली. या अत्यंत चुरशीच्या लढतीत निर्धारित वेळेत दोन्ही कुस्तीगीरांचे समान गुण झाले होते. मात्र नियमांनुसार अभिजित भोईर याने उच्च कलात्मक डावांतील गुणांच्या जोरावर प्रतिक जगताप याचा पराभव करून कांस्यपदक पटकावले.
86 किलोच्या अंतिम फेरीत माती विभागात श्रीनिवास पाथरुड याने साताऱ्याच्या रणजित राजमाने याचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
तत्पुर्वी 86 किलो माती विभागातील उपांत्य फेरीच्या लढतीत साताऱ्याच्या रणजित राजमाने यांनी मुंबई उपनगरच्या राम धायगुडे यांचा 4-2 अशा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. कांस्य पदकाच्या लढतीत मुंबई उपनगरच्या राम धायगुडे आणि वाशिमचा लखन पवारला पराभूत करुन कांस्यपदक पटकावले. दरम्यान, महाराष्ट्र केसरीची गदा आज साताऱ्यात येणार आहे.
राजमाने ठरला रौप्य पदाकाचा मानकरी
हिंद केसरी संतोष वेताळ व सुर्यकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. संजयदादा पाटील तालीम (सैदापूर) येथे सराव करत असलेला रणजित राजमाने याने 86 किलो माती विभागातील वजन गटात रौप्य पदकाची कमाई केली. रणजित हा मुळचा वाघेरी (ता. कराड) येथील मल्ल आहे. महाराष्ट्र केसरी सारख्या मानाच्या स्पर्धेत त्याने चंदेरी कामगीरी करुन जिल्हय़ासह आपल्या आखाडय़ाचा नावलौकिक वाढवला आहे. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाहेर…
चुरशीच्या लढतीत नाशीकचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. मात्र महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख याला मुंबईच्या विशाल बनकरने पराभवाचा धक्का दिला. लढतीत नवखा असतानाही विशाल अनुभवी बालारफिक समोर डगमगला नाही. दिवसभराच्या लढतीत एक महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तर दुसरा बाहेर पडल्याच्या घटनेची चर्चा होती.








