● वेदांतिकाराजे भोसले यांचा आंदोलनाला पाठिंबा ● हातात फलक घेवून दुकाने उघडण्याची मागणी ● शहरात पोलिसांचा प्रचंड फौज फाटा तैनात
“तरुण भारत” प्रतिनिधी / सातारा :
अनेक वेळा लॉकडाऊन पाळून, प्रशासनाला सहकार्य करुन देखील कोरोना बाधितांची संख्या वाढली की लॉकडाऊनचा प्रयोग करणाऱ्या प्रशासनाला लॉकडाऊन हटवा, व्यापारी वाचवा अशी हाक देत साताऱ्यात राजवाडा, मोती चौक, पोवईनाका, खणआळी परिसरात व्यापाऱ्यांनी सविनय कायदेभंग करत कोरोनाचे नियम पाळून मूक मोर्चे काढले. लॉकडाऊनला विरोध करणारे व जगण्याची वास्तवता मांडणारे फलक हातात घेवून व्यापाऱ्यांनी केलेल्या या आंदोलनात खुद्द वेदांतिकाराजे भोसलेही सहभाग झाल्या होत्या.
जिल्हा प्रशासनाकडून आरटीपीसीआर टेस्टच्या वाढत्या टक्केवारीचा विचार करुन लॉकडाऊनचा हातोडा घालण्यात आला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात मंगळवारी सातारा शहरातील सर्व व्यापारी सविनय कायदेभंग करत रस्त्यावर उतरले होते. हातात विविध मागण्यांचे फलक घेवून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याची मागणी करण्यात आली. व्यापाऱयांच्या साखळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वेदांतिकाराजे भोसले सक्रीय सहभाग नोंदवून व्यापाऱ्यांच्या वेदना माध्यमांसमोर मांडत प्रशासनाने लॉकडाऊनच्या निर्णयावर फेरविचार करत शिथीलता देण्याची मागणी केली.
संसर्ग वाढू नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन लागू केले. त्याला सातारकरांनी बिनशर्त सहकार्यही केले आहे. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. दुसऱया लाटेत रूग्ण संख्या वाढल्याने एप्रिल-मे महिन्यात कडक लॉकडाऊन लागू होते. परंतु रूग्ण संख्या कमी असताना लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. फक्त जीवनावश्यक वस्तू खरेदीला परवानगी आहे. मात्र, कापड दुकाने व इतर साहित्यांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशाला विरोध करत मंगळवारी शहरातील सर्वच व्यापारी रस्त्यावर उतरले होते. दुकाने बंद ठेवत दुकानाबाहेर व्यापारी जमले होते. काही व्यापाऱयांनी लॉकडाऊन रद्द करा, आम्हालाही घर आहे, असे फलक हातात घेतले होते. शांततेत व्यापाऱयांनी साखळी आंदोलन करत लॉकडाऊनला विरोध दर्शविला. व्यापारी रस्त्यावर उतरल्याने शहरात पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त कडक ठेवला होता.
लॉकडाऊन शिथील करेपर्यंत आंदोलन करु
लॉकडाऊन शिथील न झाल्यास त्याचे अनेक सामाजिक, आर्थिक परिणाम जनतेला भोगावे लागणार आहेत. त्यामुळे नियम पाळून दुकाने सुरु करण्यास तसेच इतर अनेक बाबी सुरु करण्यास परवानगी देण्याची गरज असून असे न झाल्यास सविनय कायदेभंग करण्याचा इशारा व्यापाऱयांसह नागरिकांनी दिला आहे. आता या आंदोलनाची कशी दखल घेणार याकडे व्यापाऱयांसह साताकरांचे लक्ष लागले आहे.
आंदोलकांवर गुन्हा नाही
प्रशासनाच्या लॉकडाऊन निर्णयाच्या विरोधात लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने कोरोनाचे नियम पाळत व्यापाऱयांनी साताऱयात साखळी आंदोलन करत मूक मोर्चे काढले. प्रचंड पोलीस फौज फाटा तैनात करुन व्यापाऱयांवर दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला. काहींनी व्यापाऱयांवर गुन्हे दाखल होणार असल्याची आवईही उठवली. मात्र, गुन्हे दाखल झाल्यास आणखी जनक्षोभ निर्माण होवू शकतो याची जाणीव असल्याने प्रशासनाकडून आंदोलनकांवर कोणताही गुन्हे दाखल झालेले नव्हते.
वेदांतिकाराजे भोसले आंदोलनात सहभागी
दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांसह कामगार, तसेच त्यांच्या कुटुंबाला फटका बसत आहे. जिल्हा प्रशासनाने लक्षात घेतले पाहिजे. चार महिने झाले जिल्ह्यात लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊन असताना कृष्णा सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक कशी झाली ? त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही का? सर्वांना एकच नियमावली लावावी. दुकानदारांनी कर्ज घेतले आहेत. त्यांच्या कर्जाचे हप्ते माफ करा. फक्त बंद नको तर सुविधा ही द्या. इतर राज्यात कोरोना नाही का? तेथील दुकाने सुरू आहे. तर सातारा जिह्यात दुकाने बंद का? यांचे उत्तर जिल्हा प्रशासनाने देणे गरजेचे आहे. पुन्हा निर्बंध शिथील करण्याचा विचार केला पाहिजे.
व्यापाऱ्याच्या खर्चाचा विचार करावा…
सातारा शहरच नव्हे तर जिल्हय़ातील सर्व व्यापार सुरू व्हावा ही आमची मागणी आहे. वेळेची मर्यादा ठेवा, पण दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्याची गरज आहे. दुकानात मालकाबरोबरच कामगारही आहेत. हे कामगार अनेक वर्षांपासून काम करतात. त्यांना कामावरून कमी केल्याने त्यांचे व कुटुंबाचे आर्थिक नुकसान होत आहे. व्यापाऱयांनाही लाईट बिल, कामगाराचे पगार, इतर खर्च आहेत. या न थांबणाऱया खर्चाचा विचार जिल्हा प्रशासनाने करावा. आणि दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी ही मागणी आहे. – अशोक बादापुरे, अध्यक्ष व्यापारी संघटना









