● देशातील पहिलाच प्रकार उघड
● 2 हजार व 2 तासांत कोरोना बरा करून मिळतोय
● लॉकडाऊन लावणाऱया प्रशासनाचे दुर्लक्ष
दीपक प्रभावळकर, सातारा
9325403232
9527403232
कोरोना महामारीमध्ये सारं जग व्यापलं असताना भारतात त्याचा गैरफायदा घेण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. ‘तरुण भारत’ याकडे कटाक्ष ठेवून असल्यानेच साताऱयात ‘कोरोना अपलोड घोटाळा’ समोर आणता आला. कोरोनाची दुसरी लाट ओसरताना लाखो लोक अँन्टीबॉडीज् तपासण्यासाठी गर्दी करू लागले असून सातारा जिल्हय़ात ‘अँन्टीबॉडीज् घोटाळा’ सुरू असल्याचे ‘तरुण भारत’च्या हाती आले आहे. संपूर्ण देशात प्रथमच हा धक्कादायक घोटाळा उघड होत असून लॉकडाऊन लावण्यात दंग असलेले प्रशासन यापासून अनभिज्ञ आहे. या घोटाळय़ाने अवघ्या दोन हजारांत व दोन तासांत कोरोना होऊन तो बरा झाल्याचा कागदोपत्री पुरावाच लोकांच्या हाती दिला जात आहे.
देशात दुसरी लाट ओसरू लागली असताना तिसऱया लाटेचं भूत उभं केलं जात आहे. यामागे लोकांनी काळजी घेण्यापेक्षा त्यांना पुन्हा भीतीखाली दाबून ठेवण्याचाच जास्त प्रयत्न होतोय.
महामारीत दवाखान्यांनी केलेल्या प्रचंड बिलांची चौकशी अद्याप झालेली नसताना पैशासाठी याच यंत्रेणेतल्या अपप्रवृत्ती बोकाळल्याची उदाहरणे वाचकांनी ‘तरुण भारत’कडे मांडली आहेत.
जिल्हय़ातील लॅब चालकांनी केलेल्या टेस्ट अपलोड न केल्याने हजारो कोरोना बाधित समाजात फिरत राहिले. कदाचित मे महिन्याच्या शेवटाला झालेल्या या प्रकारानेच जिल्हय़ातला आकडा वाढता आहे. अपलोड घोटाळय़ानंतर ‘तरुण भारत’च्या हाती नव्याने ‘अँन्टीबॉडीज् घोटाळा’चे पुरावे हाती लागलेत. प्रशासनाने याची खातरजमा करून संबंधितांवर पॅडॅमिक ऍक्टनुसार गंभीर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी रास्त आहे.
जिल्हय़ात अँन्टीबॉडी घोटाळा सुरू असल्याची कुणकुण लागल्यानंतर ‘तरुण भारत’ने कागदोपत्री पुरावा मिळवला आहे. जिल्हय़ात हे एकच उदाहरण नसून हजारो उदाहरणे घडत आहेत. मात्र फॅन्-एसी बसून महामारीची सूत्रे हाती घेतलेल्यांनी लॉकडाऊनच्या पुढे जाऊन याचा शोध घेण्याची गरज आहे. प्रशासन याबाबत किती सतर्क आहे, हे कळेलच येत्या दिवसांत.
काय आहे हा घोटाळा?
कोरोनाची बाधा झाली आहे का हे तपासण्यासाठी रॅट, आरटीपीसीआर व सिटीचेस्ट यांचा आधार घेतला जातो. मात्र कोरोना होऊन गेला आहे का हे तपासण्यासाठी शरिरात अँन्टीबॉडीज् तयार झाल्या आहेत का हे तपासले जाते.
जिल्हय़ातील 75 टक्क्यांपेक्षा जास्त युवक हे पुण्या-मुंबईला नोकरीला आहेत. त्यांनी जर सलग दोन-तिन दिवसांची सुट्टी घेऊन जिल्हय़ात आले तर त्यांना परत कामावर घेताना रॅट किंवा अँन्टीबॉडी टेस्ट करणं अनिवार्य केलं जात आहे. मग बहुतेक जण अँन्टीबॉडी टेस्टच पर्याय निवडतात. ही टेस्ट पॉझिटिव्ह येऊन अँन्टीबॉडीज् तयार झाल्याचे कळलं तर बरं नायतर रॅट करावी लागते.
भीती संपली आहे पण,
पोटापाण्याचा रजेचा प्रश्न आहे
तरुणांमधली भीती कमी झाली आहे पण अँन्टीबॉडीज निगेटिव्ह आल्या तर 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागून रोजगार बुडणार, तितके दिवस बिनपगारी रजा पडणार, असे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. त्यापेक्षा अँन्टीबॉडीज् पॉझिटिव्ह आल्या तर सारीच झंझट मिटणार ना! त्यामुळे रेडिमेड पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळवण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. यातूनच या घोटाळय़ाचा जन्म झालाय.
घडलेला प्रकार आहे धक्कादायक
जिल्हय़ातील एका मोठ्ठय़ा शहरातील नामांकित लॅबरोटरीमध्ये एका युवकाने (उदाहरणार्थ) दुपारी 1 वाजता ब्लड सॅम्पल दिले. त्याची तपासणी होऊन दुपारी 2 वाजता त्याच्या अँन्टीबॉडीज्मध्ये आयजीजी व आयजीएम हे रिपोर्ट ‘नॉट डिटेक्टेड’ असा आला. मात्र त्यानंतर असं काय घडलं कोण जाणे की बरोबर 2 तासानंतर दुपारी 1 वाजता घेतलेल्या सॅम्पलच्या आधारे दुपारी 4 वाजता त्या युवकाला अँन्टीबॉडीजमध्ये आयजीजी व आयजीएम हे दोन्ही ‘डिटेक्टेड’ म्हणून रिपोर्ट मिळाला….! एकाच सॅम्पलचे दोन विभिन्न रिपोर्ट कसे?
प्रचंड टोकाचे रिपोर्ट आहेत हे
आयजीएम डिटेक्टेड म्हणजे संबंधिताला कोरोना होऊन किमान 5 ते 12 दिवस झाले आहेत असा अर्थ होतो तर आयजीजी म्हणजे संबंधिताला कोरोना होऊन गेला आहे आणि नॉटडिटेक्टेड म्हणजे कोरोना झालेलाच नाही. यात जर पहिला रिपोर्ट निगेटिव्ह होता अन् दुसऱया दोनच तासांत त्याच ब्लड सॅम्पलमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल तर संबंधिताला अवघ्या दोन तासांत कोरानाची लागण होऊन त्याला बरे होऊन कित्येक दिवस होऊन गेल्याची किमया झाली आहे.
जिल्हय़ाबाहेरील अनेक दिग्गज लॅब चालकांशी विचारणा केली असता, हे घडणे पूर्णतः अशक्य आहे. ही केवळ तांत्रिक चूक असूच शकत नाही तर 100 टक्के हे रिपोर्ट मॅन्युप्यूलेट झाल्याचे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. दरम्यान, असे रिपोर्ट देण्यासाठी दोन हजार रुपये लागतात. यापासून अनेक वंदता तरुणांमध्ये आहे. अन्य ठिकाणी असे प्रकार होत नसल्याने अनेकांना जिल्हय़ाचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.
हे केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच
ज्या लॅब चालकांच्या गंभीर चुकांमुळे सातारा जिल्हय़ात कोरोना अपलोड घोटाळा झाला अन् त्याची शिक्षा साऱया जिल्हय़ाला भोगावी लागली अन् अजूनही जिल्हय़ातील सोशिक जनता ती शिक्षा, तो अन्याय सहन करत आहे. त्या लॅब चालकांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी होती. मात्र सातारा जिल्हा प्रशासनाने बोटचेपं धोरण घेतलं. भाजी आणायला बाहेर पडलेल्या लोकांना आडवळणाला घेऊन काठीचे फटके देणारे प्रशासन अपलोड घोटाळय़ावर गप्प राहिले. वास्तविक, त्यानंतर केलेल्या किरकोळ कारवाया सुद्धा लोकांच्या अत्यंत संतापजनक आहेत. (तो स्वतंत्रपणे विषय बघूच) मात्र प्रशासनाचा कोणताच वचक न राहिल्याने लॅब चालकांकडून अशा चुका कि घोटाळा होत आहे.
घ्या पुरावा अन् लावा शोध!
सातारा जिल्हय़ातील एका मोठय़ा शहरात बडय़ा लॅबमध्ये जे सराईतपणे घडले आहे त्याचा पुरावा सोबत जोडत आहे. या आधारे प्रशासनाने स्वतःच्या बलाढय़ यंत्रणेकडून शोध घ्यावा. अन्यथा ‘तरुण भारत’कडे मागणी करावी. त्यांना संपूर्ण पुरावा हवाली केला जाईल.
दोन्ही रिपोर्टचे फोटो
एकाच व्यक्तीचे एकाच वेळी घेतलेले सॅम्पल आणि त्याचे दुपारी दोन वाजता केलेला रिपोर्ट जो नॉट डिटेककटेड असा आहे व त्याच सॅम्पल आधारे दुपारी चार वाजता घेतलेला रिपोर्ट डिटेकटेड असा आहे