प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील दोन व लोणंदमधील एक वाहनमालकांची पाच मोठी वाहने छत्तीसगड राज्यात सुरु असलेल्या इंडिया टेको पॉवर कंपनीच्या कामासाठी भाडय़ाने देण्यात आले होते. आरंभी वाहनांचे भाडे देवून विश्वास प्राप्त केल्यानंतर ऑगस्ट 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत वाहनांचे 30 लाख 27 हजार 500 रुपये भाडे बुडवून तसेच 35 लाख रुपयांच्या पाच वाहनांची परस्पर विल्हेवाट लावून एकूण 65 लाख 27 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सोहेल कुरेशी (रा. पीएस रायपूर, राज्य छत्तीसगड) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सागर प्रकाश मोहिते (वय 37 रा. सुरेन अपार्टमेंट, कूपर कॉलनी, सदरबझार, सातारा यांनी तक्रार दिली आहे. ऑगस्ट 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. यामध्ये सोहेल कुरेशी याने इंडिया टेको पॉवरच्या कामासाठी पहिल्यांदा सागर मोहिते यांचा आयशर टँकर (एम. एच. 11 एम 4864) व अजिंक्य अशोक तपासे (रा. मल्हारपेठ, सातारा यांचा ट्रक क्रमांक (एम. एच. 11 ए. एल. 6354) भाडय़ाने घेतले. त्याचे भाडेही कुरेशी याने वेळेवर देत या दोघांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर कुरेशी याने सागर मोहिते यांचा ट्रक्टर (एम. एच. 14 एक्स 7448) व टँकरसह ट्रक क्रमांक (एम. एच. 12 सीटी 8870) तसेच हेमंत चंद्रकांत पवार रा. लोणंद यांचा ट्रक क्रमांक (एम. एच. 12 डीटी 4426) अशी वाहने टप्प्याटप्प्याने भाडय़ाने घेतली.
त्यानंतर मात्र ऑगस्ट 2019 ते डिसेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीत या पाच वाहनांचे झालेले एकूण भाडे वाहनांचे 30 लाख 27 हजार 500 रुपये कुरेशी याने दिलेले नाही. तसेच 35 लाख रुपये किंमतीची तक्रारदारांची पाच वाहनेही त्यांना परत न करता विश्वासघात व फसणूक केली. याबाबत सागर मोहिते यांनी सोहेल कुरेशी याला फोन करुन भाडे व गाडय़ा परत देण्याबाबत विचारणा केली तर कुरेशी याने मोहिते यांना तुला उचलून नेवून मारुन टाकीन, अशी धमकी दिल्याचे मोहिते यांनी तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सोहेल कुरेशी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कदम करत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आली.








