सातारा / प्रतिनिधी :
गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न भिजत पडला होता. शौचालय नसल्याने पुरुषांसह महिलांची कुचंबना वाढली आहे. ही कुचंबना दूर करण्यासाठी शहराच्या विविध भागात सहा ठिकाणी सुलभ शौचालये आणि स्वच्छतागृहे उभारण्याचा आराखडा तयार केला आहे. विशेष म्हणजे सातारा नगर पालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या काही दिवसात कामांना सुरूवात होणार आहे.
दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणात शौचालयाचा सर्व्हे करण्यात येत होता. मात्र, प्रत्यक्षात शौचालय उभारणीच्या कामाकडे दुर्लक्ष होत होते. ते काम आता सातारा नगरपालिकेने हाती घेतले आहे. पोवईनाका, मालशे पूल, गुरूवार परज, शाहू चौकातील पाण्याच्या टाकीजवळ, हुतात्मा चौकालगत तसेच कोटेश्वर चौकालगत बीओटी म्हणजे बांधा, वापरा व हस्तांतरीत करा तत्त्वावर स्वच्छतागृहे आणि शौचालये उभारण्यात येणार आहेत. यासाठी स्वतंत्र यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी स्वतंत्र यंत्रणा शौचालय, स्वच्छतागृह उभारण्यास पुढाकार घेणार नाही, अशा ठिकाणी पालिका पुढाकार घेऊन स्वनिधीतून ती उभारणार आहे.