प्रतिनिधी / नागठाणे
मालकाच्या परस्पर शोरूममधून नव्या कोऱ्या दुचाकी बाहेर काढून त्याची विक्री करण्याच्या घटनेचा बोरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नितीन दिनकर सुतार (वय३५,रा.नागठाणे,ता.सातारा) याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून महागड्या तीन यामाहा एफ.झेड दुचाकी व एक फेशिनो मोपेड अश्या सुमारे ४.५२ लाख रुपये किंमतीच्या गाड्या ताब्यात घेतल्या. विनामास्कच्या कारवाई दरम्यान ही घटना उघडकीस आली.
बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी नागठाणे (ता.सातारा) येथील चौकात विनामास्कच्या कारवाई करत असताना एक दुचाकी विना नंबरप्लेट फिरत असल्याचे आढळले. या दुचाकीस्वारास ताब्यात घेऊन गाडीसंदर्भात विचारणा केली असता चालक नितीन सुतार याने असमाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्याने शोरूममधून नव्या कोऱ्या महागड्या दुचाकी चोरून परस्पर विकल्याचे कबुल केले. त्याच्याकडून नागठाणे भागातून चार महागड्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
नितीन सुतार हा पुण्यातील वाकडेवाडी येथील शेलार यामाहा शोरूमच्या मालकाच्या गाडीवर चालक म्हणून काम करतो. मालकाने विश्वासाने त्याच्याकडे दुचाकीच्या गोडाऊनच्या चाव्या दिल्या होत्या. मात्र त्याने लॉकडाऊन काळात येथून महागड्या दुचाकी बाहेर काढून परस्पर विक्री केल्या. बोरगाव पोलिसांनी संशयावरून त्याला हटकल्यावर ही संपूर्ण घटना उघडकीस आली असून याची माहिती खडकी(पुणे) पोलिसांना देण्यात आली आहे. तेथे नितीन सुतार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक अजय बन्सल,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील,सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल,बोरगाव सपोनि डॉ.सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर सुर्वे,किरण निकम व राजू शिखरे यांनी ही घटना उघडकीस आणली.