वार्ताहर / वाठार किरोली
कोरोनाचा लढा अजूनही संपलेला नसून कोरोना विरुद्धचे युद्ध कोरोना संपेपर्यंत सुरू ठेवायचे आहे. वाठार किरोलीत कोरोनाविषयी जनजागृती आणि नियमांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे असे मत वाठार कोविड मंडल विभागाचे प्रमुख संजयकुमार सुद्रीक यांनी व्यक्त केले आहे.
वाठार (किरोली) ता. कोरेगाव येथील ६५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित सापडल्याने वाठार किरोलीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनातर्फे संपूर्ण गाव पुर्णतः सील करण्यात आले आहे. वाठारमधील सर्व बँका आणि संस्था गेले १५ दिवस बंद आहेत. वाठार किरोलीतील साखळी तोडण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
वाठार येथील पुरुषाला ताप येत असल्याने त्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये वाठार येथे उपचार घेतले. त्याच दिवशी तो स्वत: सिव्हील हॉस्पिटल सातारा येथे ऍडमिट झाला होता. शुक्रवारी त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. शुक्रवारी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने वाठारसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये साखळी तोडण्याचे आवाहन निर्माण झाले आहे. त्याचे कुटुंबातील आणि सहवासात आलेल्याना कॉरंटाईन करण्यात आले आहे.
आतापर्यंत वाठारमधील कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या ५९ झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे त्यामुळे कोरेगाव तालुक्यातील वाठार हे गाव हॉटस्पॉट ठरले आहे. त्याचबरोबर बरे होणारी संख्या ही जास्त आहे. वाठारमध्ये आतापर्यंत ५९ पैकी ३८ जणांना कोरोनामुक्त झाले असून त्यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. आता वाठारमधील २१ जण उपचार घेत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक रोडवर स्वयंसेवक नेमून बाहेर पडणाऱ्या लोकांची आणि बाहेरून येणाऱ्या लोकांची रजिस्टरमध्ये नोंद केली जात आहे. विनाकारण फिरणाऱ्या लोकांकडून दंड वसूल केला जात आहे. लोकांनी कोरोनाला सहज न घेता दैनंदिन व्यवहारात व सार्वजनिक ठिकाणी आरोग्याच्या सुरक्षितेसाठी दक्ष रहाणे अत्यावश्यक असल्याचे आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख संजयकुमार सुद्रीक सहाय्यक निबंधक कोरेगाव यांनी केले आहे.
कोरोनाबाधितच्या घराजवळील संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. वाठार गाव पूर्णपणे बंद असून फक्त हॉस्पिटल आणि मेडिकल सेवा सुरू आहे. बँका, सोसायटी व अन्य संस्था बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला मदत मिळाली आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य, गावाच्या दक्षता पथकाने घरोघरी जावून कुटूंबाना आणि ग्रामस्थांना घरी थांबण्याचे आवाहन वारंवार करीत आहेत.
वाठार व परिसरात कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली असून नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, तसेच विना मास्क व विनाकारण घरा बाहेर पडू नये नाहीतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असे आवाहन रहिमतपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी केले आहे.
यावेळी वाठारचे सरपंच सविता गुजले, उपसरपंच पोपट गायकवाड, कोरेगाव सहाय्यक निबंधक संजयकुमार सुद्रीक, अधिकराव शिंदे, तानाजी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. असिफ जमादार, डॉ. अनिरुद्ध माने, मंडलाधिकारी विनोद सावंत, तलाठी आर. एम. होनराव, ग्रामसेवक जितेंद्र निकम, सचिव विकास गायकवाड, कॉ. सचिन राठोड सर्व आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य व सर्व आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.