पाटखळची निवडणूकच झाली रद्द
सातारा / प्रतिनिधी :
सातारा तालुक्यातील सवंदेनशील समजल्या जाणाऱ्या पाटखळ गावची प्रभाग रचनाच चुकीची झालेली आहे, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीवरुन आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें समोर ही बाब मांडली. त्यानंतर पाटखळची ग्रामपंचायत निवडणूकच रद्द करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काल रात्री उशीरा काढला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिंदे यांनी चांगलाच दे धक्का दिला.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्याच बालकिल्यात अधिकारीही स्थानिक नेत्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करतात. त्यामुळे सातारा तालुक्यातील पाटखळ येथे प्रभाग रचना करताना चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. हरकती घेतल्या होत्या. परंतु हरकतींना कोलदांडा देत प्रभाग रचना केली होती. निवडणूक लागली होती.
आमदार शिंदे यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार करताच शिंदे यांनी तो मुद्दा थेट मुख्यमंत्री ठाकरे, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मांडला. राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर रात्री उशीरा राज्य निवडणूक आयोगाने पाटखळची निवडणूक स्थगित करुन नव्याने प्रभाग रचना करण्याचा आदेश दिला गेला आहे. हा आदेश मिळताच गावात आमदार महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आज सकाळी आमदार महेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्यांचे विशेष आभार मानले तर गावातल्या दुसऱ्या गटाचे म्हणजे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाचे कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचा आदेश धडकला
राज्य निवडणूक आयोगाने रात्री उशीरा आदेश सातारा ग्रामपंचायत निवडणूक शाखेकडे पाठवला. त्या आदेशात पाटखळ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे सर्व टप्पे रद्द करुन नव्याने प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी या ग्रामपंचायतीचा समावेश आयोगाकडुन जानेवारी 2021 मध्ये देण्यात येणाऱ्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात यावा, ग्रामपंचायतीची प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने करण्यास जबाबदार असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे खुलासे तात्काळ घेवून आयोगास सादर करावेत, असा आदेश राज्य निवडणूक विभागाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी दिलेले आहेत.