प्रतिनिधी / नागठाणे
भरतगाववाडी (ता.सातारा) येथे बिबट्याचा खात्रीशीर वावर असल्याचे चित्र पुन्हा एकवेळ स्पष्ट झाले आहे. शिवारात राखणदारीस असलेले पाळीव कुत्र्याची शिकार झाली असून घटनास्थळी आढळलेल्या पावलांच्या ठश्यावरून ते वन्य श्वापद बिबट्या असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ऐन सुगीच्या दिवसात घडलेल्या या घटनेमुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार भरतगाववाडी येथील किशोर चव्हाण यांचे ठाकर नावाचे शिवारातील उसाचे पटीत दोन दिवसांपूर्वी वन्य श्वापदाने त्यांचे शिवारातील वस्तीवरील एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यास खाल्ले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात वनविभागास माहिती दिल्यानंतर भरतगाव बिटचे वनरक्षक राज मोसलगी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी तातडीने धाव घेऊन सदर घटनेचा पंचनामा केला. तसेच संबधित शिवारातील ठिकाणावर आढळलेल्या ठश्यावरून हे वन्य श्वापद बिबट्या असल्याचे सांगितले.
मागील दोन महिन्यांपूर्वी भरतगाववाडी याच गावात विनायक मोहिते यांचे शिवारात रात्रीचे सुमारास ज्वारीचे पिकास पाणी देण्यासाठी आणि रात्रीचे वेळी वस्तीवर दुचाकीवरून मुक्कामास जाणाऱ्या प्रकाश पवार आणि श्रीकांत मोहिते यांना सदर वन्यप्राणी बिबट्या हा वस्तीचे समोरच एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करताना निदर्शनास आला होता. परंतु दुचाकीचे हेडलाईटचे प्रकाश झोताने आणि हॉर्नच्या आवाजामुळे बिबट्याने कुत्र्यास सोडून तेथून पळ काढला होता. त्या वेळीही वनविभागाने येथे पाहणी केली. मात्र पुन्हा त्याकडे विभागाने दुर्लक्षच केले.
सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर उसतोड चालू आहे. तसेच ज्वारी पिकाची काढणी व मळणीची कामेही जोराने सुरू आहेत. त्यामुळे रात्रीचे सुमारास शिवारात ज्वारी पिकाची काढणीची कामे करण्यासाठी ग्रामस्थ शिवारात जात असतात.गावच्या शिवार परिसरात बिबट्याचा खात्रीशीर वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनरक्षक राज मोसलगी यांनी गावातील श्री गणेश आणि हनुमान मंदिरावर बिबट्याचे बाबत घ्यावयाची काळजी याबाबतचे पोस्टर लावून शिवारात रात्रीचे वेळी एकटे फिरू नये. फिरताना सोबत बॅटरी तसेच काठीचा वापर करावा.
बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा, त्यास डिवचण्याचा, पाठलाग करण्याचा तसेच त्याचे छायाचित्रण करण्याचा प्रयत्न करू नये, एकट्या- दुकट्याने शिवारात न जाता सोबत चार-पाच जणांनी मिळून समूहाने जावे अशी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.