पाच हजार रुपये स्वीकारत होती,रात्री उशिरा अंगझडती घेण्याचे काम सुरु,
प्रतिनिधी/ सातारा
चतुर्थ वार्षिक पाहणी अहवालात घरभाडे कमी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना सातारा पालिकेतील वसुली विभागातील दोन कर्मचारी शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले. प्रदीप शंकर कदम (वय 55), विनायक विलास गोडबोले (वय 45 दोघे रा.सातारा) अशी त्यांची नावे असून दोघेही वसुली विभागात लिपिक सहाय्यक या पदावर काम करत होते. रात्री उशिरा त्या दोघांची अंगझडती घेण्याचे काम सुरू होते.
सातारा पालिकेचे चतुर्थ वार्षिक पाहणीचे काम पूर्ण होत आले आहे. त्याच कामात घरभाडे कमी करण्यासाठी ज्यांच्या तक्रारी आहेत ते पालिकेत वसुली विभागात जाऊन तक्रार सांगत असतात. घरभाडे कमी होत असेल तर ते मार्ग काढून केले जाते. मात्र, वसुली विभागातल्या काही कर्मचाऱयांना नागरिकांना चुकीची कारणे सांगून त्रुटी दाखवून ज्यादा कर आकारणी केली जात असे. वसुली विभागाच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्यातच शनिवार पेठेतल्या एका व्यक्तीला ज्यादा कराची नोटीस दिली होती. भाडेकरुची माहिती लपवली अशी त्या तक्रारदारावर वसूली विभागाकडून त्रुटी काढली. त्यामुळे त्या तक्रारदाराने कमी कर कसा येईल त्या करता पालिकेचे शनिवार पेठ हा भाग असलेले लिपिक सहायक प्रदीप कदम आणि विनायक गोडबोले यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार करताच शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजता लाचलुचपत विभागाने पालिकेत सापळा रचला. पाच हजार रुपये स्वीकारताना त्या दोघांना अलगद पकडले. सायंकाळी उशिरा त्यांची अंगझडती सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक सांगली डीवाय एसपी घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस कर्मचारी काटकर, राजे, खरात, ताटे, तुषार भोसले यांनी केली. दरम्यान, दोघांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दोन वर्षानंतर पुन्हा सातारा पालिकेत ट्रप
सातारा पालिकेत दोन वर्षांपूर्वी 8 जूनला उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे, गणेश टोपे आणि प्रवीण यादव हे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले होते. ते वातावरण आता कुठं निवळू लागले होते तोच वसुली विभागाच्या दोन कर्मचाऱयांनी पाच हजार रुपयांची लाच घेतली अन् पालिकेचे नाव धुळीला मिळवले.
क्लिनर पदावर दोघे ही कार्यरत
लाचलुचपत विभागाने पकडलेले ते दोन कर्मचारी सध्या तात्पुरते वसुली विभागात लिपिक सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. ते दोघे मूळ क्लिनर या पदावर काम करतात. दोघांच्या बाबतीत अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱयांपर्यत झाल्या होत्या. अनेकांनी त्यांना समजवले होते तरीही त्यांच्यात सुधारणा होत नव्हती. अखेर आज ते लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. तसे पालिकेत जोरदार चर्चा सुरू झाली.
वसुली विभागात अनेक भानगडी
सातारा पालिकेच्या वसुली विभागात वसुली विभाग प्रमुख प्रशांत खटावकर यांना काहीच या कळू न देता अनेक कर्मचारी भानगडी करत असतात. त्याच्या तक्रारी थेट मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यांपर्यत अनेकदा गेल्या आहेत. त्यावरून त्यांनी ही अनेकदा झाडाझडती या कर्मचाऱयांची केली असल्याची जोरदार चर्चा पालिकेत सुरू होती.








