प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेची चतुर्थवार्षिक पाहणी प्रक्रियेनुसार कर वाढीच्या प्रक्रियेलाच तुर्तास ब्रेक लागला आहे. तसे लेखी आदेश शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पाठपुरावा केला होता. दरम्यान, ऐन वसुलीच्या मोहिमेवेळीच यास ब्रेक लागला असून जुन्या दराने वसुली होणार आहे. तर वसुली विभागाचे अधीक्षक प्रशांत खटावकर हे आजारपणाच्या रजेवर एक महिना गेले आहेत. दरम्यान, त्यांचा पदभार श्रीमती प्रसन्ना जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे वसुलीचे उद्दीष्ठ पूर्ण होणार काय ? असाही यक्ष प्रश्न उभा राहणार आहे.
सातारा शहरात कोरोना काळात थकबाकी मोठ्या प्रमाणावर राहिलेली आहे. ती थकबाकी वसुली करता येत नव्हती. त्यातच कर माफीच्या ठरावावऊन बराच गदारोळ माजला होता. त्यावऊन गेली दोन वर्ष कर वसुलीचे टार्गेट पालिकेला गाठता आले नव्हते. त्यातच चतुर्थवार्षिक करवाढीचा पुढे अजेंडा आला. त्यास आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवला. आमदार शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली. त्यावऊन ही प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे सातारा शहरवासियांकडून आमदार शिवेंद्रराजे यांचे आभार मानले जात आहेत. दरम्यान, यासाठी सातारकरांनी अपिले केलेली होती. सुमारे 50 हजार मिळकतधारकांनी अपिले करण्यात आली होती. सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते. तिही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
वसुली अधीक्षक गेले आजारपणाच्या रजेवर
सातारा पालिकेत वसुली मोहिम फेब्रुवारी महिन्यात अतिशय तीव्र करायची होती. त्याकरता राजकीय दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिलेल्या 45 कोटींचे उद्दीष्ठ गाठण्यासाठी अनुभवी असेच वसुली अधीक्षक प्रशांत खटावकर यांचीच गरज होती. परंतु ते आजारपणाच्या रजेवर तब्बल एक महिना गेलेले आहेत. त्यांच्या जागी तात्पुरता पदभार श्रीमती प्रसन्ना जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांच्या दिमतीला जरी नव्या दमाचे अधिकारी असले तरी वसुलीचे 45 कोटीचे उद्दीष्ठ पूर्ण होणार काय असा सवाल उपस्थित होवू लागलेला आहे.
जुन्याच दराने कर वसुलीची प्रक्रिया सुरू
शासनाच्या सर्व नियमानुसार चतुर्थवार्षिक पाहणी व प्रस्तावित केलेली वाढ त्यावरील अपिल सुनावणीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. लोकनियुक्त कार्यकारणी अस्तित्वात आल्यानंतर त्यावर कार्यवाही होईल. तोपर्यंत जुन्याच दराने कर आकारणी सुरू आहे.
अभिजित बापट, मुख्याधिकारी








