शासनाच्या निर्णयाकडे पालकांचे डोळे
प्रतिनिधी / औंध
क्रीडा विभागाकडे उशिरा दाखल केलेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रेस गुणांचे प्रस्ताव लटकल्याने वर्ष वाया जाते कि काय? या काळजीने 368 विद्यार्थी खेळाडूंचे जीव टांगणीला लागले आहेत. याबाबत राज्यशासन काय निर्णय घेणार याकडे पालकांचे डोळे लागले आहेत.
मैदानावर प्रत्यक्ष घाम गाळून नैपुण्य दाखवणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी क्रीडाविभागाने खेळाडूंना ग्रेस गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूंना दहावी बारावी इयत्तेत 25 ग्रेस गुण देण्यात येतात. याकरिता जिल्हा स्तरासाठी पाच गुण, विभागाकरीता 10 गुण तसेच राज्यस्तरासाठी 15 राष्ट्रीय स्तरावर 20 गुण देण्यात येतात. ग्रेस गुणासाठी पात्र खेळांडूंचे प्रस्ताव क्रीडाविभागामार्फत बोर्डाकडे पाठवण्यात येतात. यंदादेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ग्रेस गुणांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली. तरी देखील जिल्हाबंदी आणि कोरोनामुळे काही खेळांडूंचे प्रस्ताव वेळेत दाखल झाले नाहीत. दहावी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर खेळाडू असलेल्या विद्यार्थ्यांची एक दोन गुणासाठी दांडी उडाली. पात्र असून देखील ग्रेस गुण मिळाले नसल्याची चूक पालकांच्या लक्षात आली. यानंतर शाळा आणि क्रीडाविभागाचे दरवाजे पालकांनी ठोठावले. मात्र, मुदत संपल्याने प्रस्ताव दाखल करून घेण्यासाठी क्रीडाविभागाने नकार दिला. मात्र, राज्यातील असे तब्बल 368 खेळाडू ग्रेस गुणापासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आल्यामुळे वंचित विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने पात्र खेळांडूंचे प्रस्ताव दाखल करून घेण्यासाठी क्रीडा विभागाला आदेश दिले होते.
यानुसार पालक आणि शाळांनी धावपळ करून प्रस्ताव दाखल केले आहेत. दीड महिना उलटून गेला तरी या प्रस्तावावर कार्यवाही झाली नसल्याने या दाखल केलेल्या प्रस्तावाचे नेमके काय होणार या काळजीने पालक आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. अद्याप काही विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी या ग्रेस गुणाकडे डोळे लावून बसले आहेत.
प्रलंबित प्रस्तावाबद्दल क्रीडासंचालक पुणे यांचेशी संपर्क साधला असता राज्यातून ग्रेस गुणासाठी दाखल केलेले सर्व प्रस्ताव अद्ययावत करून शासनाला सादर करण्यात आले असल्याचे कार्यालयातून दै. तरुण भारतला सांगण्यात आले.
वर्षे वाया जाऊ नये.
शाळेने पात्र खेळाडूचे प्रस्तावच सादर केले नाहीत. हक्काचे गुण मिळाले नसल्याने अनुत्तीर्ण होण्याची नामुष्की विद्यार्थ्यांच्यावर ओढावली आहे. याचा मानसिक धक्का पालक आणि खेळाडूंना बसला आहे. एक खेळाडू घडवण्यासाठी पालकांनाही खूप राबावे लागते.ग्रेस गुण हे मैदानात घेतलेल्या कष्टाचे गुण आहेत. त्यामुळे शासनाने पात्र खेळाडूंना गुण देऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे. मुलांचे वर्ष वाया जाऊन देऊ नये.
अशोक जाधव, चिंचोली ता. शिराळा









