प्रतिनिधी/ सातारा
येथील सातारा कारागृहातील कोरोना बाधीत कैद्यांची संख्या नऊ झाल्याने कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे. इतर कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने आज कारागृहातील 15 कैद्यांना हलविण्यात आले आहे. येथील यशोदा क्वारंटाईन सेंटरमध्ये या कैद्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पुणे येथून 48 कैदी सातारा कारागृहात पाठविण्यात आले होते. त्यातील सुरवितीला 2 कैद्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यामुळे कारागृहासह परिसर व शहरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर लगेचच दोन व नंतर पाच कैदी कोरोना बाधित झाल्याचे समोर आले. आता कारागृहातील कोरोना बाधित कैद्यांची संख्या नऊ झाली आहे. त्यामध्ये पाच महिला कैद्यांचा समावेश आहे. त्यामुळे कारागृहासह शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.
सातारा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे अडीचशे कैदी आहेत. त्यातील नऊ कैदी कोरोना बाधित असल्याने बाकीच्या कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या आठ दिवसात कारागृहातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच गेली असल्याने कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. त्यासाठी कारागृहातील बाधितांच्या निकट सहवासित 15 कैद्यांना इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानूसार 15 कैद्यांना येथील यशोदा क्वारंटाइन सेंटरमध्ये आज सकाळी हालविण्यात आले. कडक बंदोबस्तात सोशल डिस्टन्सींगचे नियमांचे पालन करुन केद्यांना कारागृहातून बाहेर काढण्यात आले. तेथून त्यांना थेट येथील यशोदा क्वारंटाइन सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.
दरम्यान, कारागृहात नेमणूक असलेल्या तसेच कोरोना बाधित कैद्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचाऱयांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच कारागृहाच्या परिसरातच पोलीस वसाहत, शहर पोलीस स्टेशन व मुख्यालय असल्याने परिसरात भितीचे वातावरण परसले आहे.








