दररोज किमान २०,००० व्यक्तींचे होणार लसीकरण
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात सुमारे आठ लाख व्यक्ती ४५ वर्षे अथवा त्यावरील वयोगटातील असून त्यांचे लसीकरण एक एप्रिलपासून करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जीसी यांनी विविध संबंधित विभागांना संयुक्तपणे दिले आहेत.
प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज किमान १५० व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. ग्रामदक्षता समितीने सर्व ते नियोजन करावे असे देखील आदेशात म्हटले आहे. प्रत्येक दिवशी किमान वीस हजार व्यक्तींना लसीकरण होईल, म्हणजेच सध्या रोज आठ हजार लसीकरण होत आहे. त्याच्या दुपटीपेक्षा जास्त लसीकरण होईल असे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी अशा प्रमुख अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विविध अधिकारी व कर्मचारी विविध प्रकारच्या उपाययोजना करून रोजच्यारोज अहवाल सादर करणार आहेत. तसे स्पष्ट निर्देश या संयुक्त आदेशात देण्यात आले आहेत. त्यासाठी एक एप्रिल पासून को-वीन वेबपोर्टलवर 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील व्यक्तींची लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
ऑनलाईन शिक्षणप्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांतर्फे संदेश देऊन 45 वर्षे वयोगटावरील जास्तीत जास्त व्यक्तींना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यात येईल. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या गृहभेटी देऊन लसीकरणाचे महत्त्व सांगतील. प्राथमिक शिक्षक तसेच ग्रामीण स्तरावरील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका गृह भेटी देतील. लसीकरणाचे महत्त्व सांगतील .तसेच लसीकरण ठिकाण, लसीकरणाचा दिवस याचीदेखील माहिती देतील. प्राथमिक शिक्षक लसीकरणाचे ठिकाणी उपस्थित राहतील आणि सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण होण्यासाठी ग्रामसेवक आणि तलाठी यांच्याशी समन्वय साधतील. या मोहिमेमध्ये मंडल अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील ,कोतवाल, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, प्राथमिक शिक्षक ,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका इत्यादी घटक नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.