प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हा हा क्रांतीचा जिल्हा आहे. याच जिल्ह्यात दारूच्या बाटलीला आडवी केल्याचा इतिहास आहे. असे असताना सध्याची कोरोनाची बिकट परिस्थिती असताना जिल्हा प्रशासन दारूची दुकाने सुरू करणार नाही असे चित्र दिसत होते. परंतु आज राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पत्र वाऱ्यासारखे व्हायरल झाले असून त्यात जिल्ह्यातील 46 दारूची दुकाने सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजपासून दारूच्या दुकानाबाहेर दारूची बाटली खरेदी करण्यासाठी रांगा दिसणार आहेत.
सोशल डिस्टन्स ठेवून विक्री करण्यासाठी चक्क दारू दुकानदारांनी कालपासूनच तयारी सुरू केल्याचे चित्र दिसत होते दरम्यान, जिल्हयात दारूच्या दुकानांना परवाना दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक गावातून दारूची बाटली हद्दपार झाली आहे. त्यासाठी महिलांनी उठाव करून मतदान केल्याचा इतिहास आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या कार्यकाळात काही दारुची दुकाने बंद झाली आहे. महिलांनी मोर्चे, आंदोलने करून उठाव केल्याचे घटना जिल्ह्याच्या स्मृती पटलावर आहेत. असे असताना सातारा जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि.23 मार्चपासून बंद करण्यात आलेली दारूची दुकाने सुरू करू नयेत अशी मागणी होत होती. मात्र, नागरिकांच्या मागणीला तिलांजली देत राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूल कारण पुढे करत काही नियम व अटींवर जिल्ह्यातील 46 दारूच्या दुकानांना परवानगी दिल्याचा आदेश काढण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हा आदेश जिल्हाप्रशासनाने जाहीर करण्याआधीच वाऱ्यासारखा सोशल मीडियावर फिरत होता. त्यात म्हटले आहे की दि.13पासून सकाळी दहा पासून सायंकाळी 6 पर्यंत ही दारूची दुकाने काही नियम व अटीवर सुरू राहणार आहेत. त्या अटीचे उल्लंघन झाल्यास केवळ दोन महिने परवाना निलंबित करणायत येणार आहे. दारू दुकानांना परवानगी दिल्याबद्दल महिला, सामजिक कार्यकर्ते यांच्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे.








