सातारा :U अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात 2600 रुपये प्र.मे. टनाप्रमाणे (पहिला ॲडव्हान्स हप्ता) दि. 20 डिसेंबरअखेर गाळपास आलेल्या उसाचे ऊसबिल संबंधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे. कारखान्याची एफआरपी रू.3043/- प्र.मे.टन असून, एफआरपीच्या 87% प्रमाणे ऊसबिले अदा केली आहेत, असे स्पष्ट करतानाच अजिंक्यतारा कारखाना प्रत्येक 10 दिवसास ऊसबिले वर्ग करणारा महाराष्ट्रातील पहिलाच साखर कारखाना असून त्याचे संचालक मंडळाला मनस्वी समाधान आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
कारखान्याने वेळोवेळी आधुनिक मशिनरी बसवून प्लॅन्टचे ॲटोमॅझेशन केल्यामुळे कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 4500 मे.टनाप्रमाणे सुरू आहे. आज अखेर 2,27,840 मे.टन इतके गाळप झाले असून आजचा दैनिक साखर उतारा 13.05 % इतका आहे. आज अखेरचा सरासरी साखर उतारा 11.49 % आहे.
कारखान्याचे कामकाज पूर्ण कार्यक्षमतेने चालू असून कारखान्याने इथेनॉल प्लॅन्टची निर्मिती क्षमता 30,000 मे.टनावरून 45,000 मे.टन प्रती दिन इतकी केलेली असल्याने त्याचा फायदा कारखान्यास निश्चितच होत आहे. तसेच को-जन प्रकल्प पुर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. यामुळे उसपुरवठादार शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेत अदा करणे सोयीचे होत आहे. तसेच साखरेची निर्मिती उच्च दर्जाची होत असून साखरेचा अँक्युमसा 70 ते 75 % आहे. त्यामुळे औद्योगिक कंपनी, बाजारपेठेत अजिंक्यतारा कारखान्याच्या साखरेला चांगली मागणी आहे. तसेच शेतक-यांना कारखान्याच्या इतिहासात उच्चांकी दर रू 3043/- प्र.मे.टन मिळणार असल्याने ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांच्यात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. कारखान्याकडे पुरेशा प्रमाणात ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा असून, कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस वेळेत तोडून गाळपास आणण्यात येईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव दिनकरराव सावंत, व्हा.चेअरमन विश्वास रामचंद्र शेडगे, कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई व सर्व संचालक उपस्थित होते.