शवचिकित्सा अहवाल डॉक्टरांकडून राखीव मृत्यूबाबत उलट सुलट चर्चा
प्रतिनिधी/ म्हापसा
हणजूण येथे पार्किंग प्रकल्पात शुक्रवारी दुपारी पार्किंग कंत्राटदार सागर नाईक याचा कर्नाटकातील टोळीतील पाच जणांनी मारहाण करून खून केल्याचे म्हटले असले तरी पोलिसांनी आता घुमजाव करीत ते संशयित आरोपी नसून त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोबीत सक्सेना यांनी पत्रकारांना दिली. सागरच्या मारेकऱयांना पोलीस संरक्षण देऊ पाहत आहे याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान सागर दंडुक्यानी त्या पाच जणांना मारताना सीसीटीव्ही पॅमेराद्वारे आढळून आला असून सागरने त्या पाच जणांना मरहाण केल्यानंतर काही अंतरावर जाऊन सागर खाली कोसळल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सागरचा मृत्यू नेमका मारहाणीमुळे झाला की त्याला हृदयविकाराचा झटका आला याबाबत हे गुढ निर्माण झाले असून वैद्यकीय शवचिकित्सा अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
निरीक्षक सुरज गांवस व सहयोगी पोलीस पथकाकडून शनिवारी दिवसभर परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. दरम्यान यावेळी सागर नाईक याच्याकडून कर्नाटकी टोळक्यातील महिलांसहित पाच पुरुषांना दंडुक्याच्या साहाय्याने जबर मारहाण होत असल्याचे सीसीटीव्ही पॅमेरात आढळून आले आहे. महिला सागरच्या पायावर घालून घेत जीवाची भीक मागत होत्या असे आढळून आले आहे. शनिवारी सायंकाळी या घटनेसंदर्भात स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला असता त्या कर्नाटकी पर्यटक टोळक्यातील दोघांवर सदोष मनुष्यवधाचा आरोप (भारतीय दंड संहितेच्या 302 कलमाखाली) करण्यात आल्याची माहिती मिळाली असून त्यांची रवानगी स्थानिक पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. शिवाय त्याच्या डोक्यावर कोणतीही जखम झाली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सागर नाईक पर्यटकावर हल्ला करताना दिसत असून पर्यटक तेथून पळून गेले आहे. मारहाण झाल्यावर तेथून परत येताना सागर खाली कोसळला. पोलिसांनी पाच पर्यटकांना ताब्यात घेतले मात्र त्यांना अटक करण्यात आली नाही. हे पोलिसांचे घुमजाव की खरोखरच आरोपीला पकडण्यात आले आहे याचा तपास सुरू आहे.
रक्तस्त्राव नाही मात्र सागरचा मृत्यू
सागर हणजूण बीचजवळ पार्किंग अटेंडंट म्हणून काम करत होता. हाणामारी झाल्यावर सागरही जखमी झाला. मात्र रुग्णालयात जाताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हणजूण बीच, हणजूण 11 रेस्टॉरंटजवळ ही घटना घडली आणि याचा हेतू अचानक झालेले भांडण हा होता. कानाखाली मारल्याने पीडिताला दुखापत झाली आणि नंतर त्याचा हणजूणच्या सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये जात असताना वाटेतच मृत्यू झाला. निरीक्षक सूरज गावस यांनी तातडीने कारवाई केली आणि पाचही पुरुष व्यक्ती म्हणजेच टाटा सुमो जीपमधील रहिवासी क्र. केए- 01पी-7326 काणकोण पोलिसांच्या मदतीने बॉर्डर चेकपोस्ट पाळोळे काणकोण येथे ताब्यात घेण्यात आले. अधीक्षक उत्तर आणि उपअधीक्षक म्हापसा यांच्या देखरेखीखाली हणजूण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सूरज गावस हे अधिक तपास करीत आहेत.









