गोवा फॉरवर्ड गटसमितीचा इशारा पीडीएत समाविष्ट करण्यासही विरोध
प्रतिनिधी/ पणजी
आमदार फ्रन्सिस सिल्वेरा यांनी सांतआंद्रेतील मतदारांचा तसेच मच्छीमारांचा घात केला असून मरीना आणण्याचा व सांतआंद्रे पीडीएत समाविष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्यास तो खपवून घेणार नाही आणि ते करु देणार नाही, असा इशारा सांतआंद्रे गोवा फॉरवर्ड गट समितीने दिला आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोवा फॉरवर्डचे तेथील नेते जगदीश भोबे यांनी सांगितले की, सिल्वेरा हे सांतआंद्रेत मरीना प्रकल्प आणू पाहात असून त्यास ग्रामस्थांचा पूर्णपणे विरोध आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे देखील मरीना प्रकल्प येणारच आणि तो पर्यटनासाठी वरदान ठरणार असे सांगतात. सांतआंद्रेत 4 ते 5 मच्छीमार आहेत अशी बतावणी डॉ. सावंत यांनी केल्याचे भोबे यांनी निदर्शनास आणले. आमदार सिल्वेरा यांनी डॉ. सावंत यांचे कान भरले असून मरीना प्रकल्पास आम्ही शेवटपर्यंत विरोध करणार असल्याचे भोबे यांनी स्पष्ट केले.
सांतआंद्रेच्या फुटीर आमदाराने विकासासाठी भाजपमध्ये गेल्याचे सांगितले होते आणि ते आता पुन्हा मरीना प्रकल्पासाठी हालचाली करीत आहेत. जो प्रकल्प तेथील जनतेला नको आहे तोच जनतेच्या माथी मारण्यासाठी ते पुढे सरसावले आहेत हाच त्यांचा पहिला विकास आहे. सांतआंद्रे पीडीएत समाविष्ट करण्याचा त्यांचा डाव आहे. ती दोन्ही कारस्थाने गोवा फॉरवर्ड पक्ष हाणून पाडणार असल्याचा इशारा भोबे यांनी दिला आहे. त्यांच्यासमवेत सांतोविन फर्नांडिस, अँथनी परेरा उपस्थित होते. त्यांनी आपले म्हणणे मांडून मरीना प्रकल्पास तसेच सांतआंद्रे पीडीएत समाविष्ट करण्यास विरोध दर्शविला.
सिल्वेरा हे स्वतः मच्छीमारी व्यवसायात असून ते सांतआंद्रेत केवळ 4 ते 5 मच्छीमार असल्याचे सांगून आपल्याच मच्छीमार बांधवांवर अन्याय करीत आहेत असे त्या सर्वांनी निदर्शनास आणले. ‘गोयंकार अगेन्स्ट मरीना’ ह एक गट सांतआंद्रेत कार्यरत असून त्यास गोवा फॉरवर्ड पक्ष पाठिंबा देणार असल्याचे भोबे यांनी नमूद केले.