प्रतिनिधी/सांगली
जागतिक दर्जाच्या ओडॅक्स संस्थेशी संलग्न असलेल्या सांगली रँडोनिअर क्लब तर्फे रविवार २० रोजी २०० किमीचा सायकलिंग उपक्रम संपन्न झाला. क्लबचे संस्थापक सदस्य रोहित थोरात, डॉ अविनाश झळके, शरद कुंभार आणि डॉ. केतन गद्रे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी ५ वाजता प्रमुख अतिथी आयर्नमन स्वप्नील कुंभारकर यांच्या हस्ते झेंडा फडकवून विश्रामबाग चौक येथून करण्यात आली.
सांगली-वारूळ-सांगली (जयसिंगपूर बायपास आणि नंतर पन्हाळा घाट मार्गे) असा मार्ग ठरवण्यात आला होता. हे अंतर १३ तास ३० मिनिटात पूर्ण करावयाचे होते. घाटातील ट्रॅफिक आणि तीव्र चढाईचा धैर्याने सामना करत सहभागी २७ सायकलपटूपैकी १२ जणांनी हे अंतर निर्धारित वेळेत पूर्ण केले.
या उपक्रमामध्ये सहभागी सायकलपटूपैकी दिनेश पवार यांनी सर्वात वेगवान सायकलपटूचा बहुमान मिळवत केवळ १० तास २६ मिनिटांमध्ये २०० किमी चे अंतर पूर्ण केले. त्यांच्या पाठोपाठ स्वप्नील माने यांनी ११ तासात हे अंतर पूर्ण केले. ज्येष्ठ सदस्य गणपत पवार (माऊली), सुदीप हुण्णुर आणि शाम कुलकर्णी यांनी जिद्द आणि चिकाटी यांचे दर्शन घडवत २०० किमीचे अंतर पुर्ण केले.
क्लबतर्फे आगामी काळात प्रत्येक महिन्याला असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. इच्छुकांनी यात सहभाग किंवा किंवा स्वयंसेवक म्हणून मदत करण्याची असल्यास रोहित थोरात, डॉ. अविनाश झळके, नेवेन्द्र वालावलकर, शरद कुंभार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.