पालकमंत्री जयंत पाटील आज महापालिकेत : प्रशासनाची जय्यत तयारी : समांतर पुलाबाबतही चर्चा होणार
प्रतिनिधी / सांगली
भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील आज मंगळवारी प्रथमच महापलिकेत येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी राष्ट्रवादीने केली आहे. कुपवाड ड्रेनेज, शेरीनाला, आपत्ती व्यवस्थापन, एलईडी प्रकल्पासह तब्बल 356 कोटींच्या योजनांचा आढावा ते घेणार आहेत. सर्व योजनांचे सविस्तर `प्रझेंटेशन’ पालकमंत्र्यांसमोर करण्यात येणार आहे. त्याची तयारी मनपा प्रशासनाने केली आहे. आयुक्तांसह सर्व पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
महापालिकेतील भाजपची सत्ता अडीच वर्षातच उलथवण्यामध्ये त्यांचा सिहांचा वाटा आहे. भाजपची सत्ता असताना त्यांनी महापालिकेत आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरची बैठक वगळता ते महापालिकेत आले नव्हते. सत्तांतरानंतर ते पहिल्यांदाच येत आहेत.
250 कोटींची कुपवाड ड्रेनेज योजना
महापौर दिग्विजय सूर्यवंशी चांगलेच `ऍक्टिव्ह’ झाले असून कुपवाड ड्रेनेजसह 350 कोटीहून अधिक निधीच्या योजनांचे आराखडे केले आहेत. कुपवाड ड्रेनेजेचा 250 कोटी रुपये खर्चाच्या आराखडा शासनाला सादर केला आहे. कुपवाडच्यानागरिकांनी ड्रेनेज योजनेची मागणी केली आहे. हा प्रकल्पाला मंजुरी मिळावी, यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.
शेरीनाल्यासाठी 60 कोटींचा आराखडा
शेरीनाल्यातील पाणी कृष्णा नदीत मिसळून प्रदुषित होते. त्यासाठी जिजी मारुती, हरिपूर रोड व शेरीनाला या तीन नाल्यातील पाणी एकाच ठिकाणी उचलून शुद्धीकरणाची यंत्रणा उभारण्यासाठी 60 कोटीचा आराखडा तयार केला आहे. हा प्रस्तावही शासनाकडे दिला आहे. महापालिकेत पाच जिह्याचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे. या केंद्राच्या सक्षमीकरणासाठी 45 कोटी 75 लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. याशिवाय 60 कोटी रुपयांचा एलईडी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
समांतर पुलाबाबत उत्सुकता
समांतर पुलाच्या कामासाठी भाजप आमदार सुधीर गाडगीळ आक्रमक झाले आहेत. तर काही व्यापाऱयांनी या पुलाला विरोध दर्शवला आहे. रविवारी व्यापाऱयांची या संदर्भात बैठकही झाली. आज पालकमंत्र्यांच्या समोरही याबाबत सखोल चर्चा होणार आहे. यामध्ये पालकमंत्री काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.