प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने कोरोना रुग्णांसाठी शासकीय यंत्रणा लवकरात लवकर सुरू करणेबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री जयंत पाटील यांना मेलद्वारे व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी निवेदन दिले. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन चार महिन्यातील सर्वाधिक ३६० रुग्ण काल मंगळवार आढळले. येत्या पंधरा दिवसात रुग्ण संख्या वेगाने वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच कोरोनाशी लढ्यास सज्जता ठेवली पाहिजे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन यांना सूचना देऊन त्याचे नियोजन तातडीने करण्याची गरज आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार नव्हता. मात्र यंदा मार्चपासूनच कोरोनाची महामारी वेगाने पसरत आहे. गेल्या वर्षी जुलैनंतर कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू लागल्यावर प्रशासनाची धावपळ झाली होती. त्यावेळी कोट्यावधी रुपये खर्चुन जिल्हा प्रशासनाने क्रीडा संकुलमध्ये तसेच महापालिका प्रशासनाने आदीसागर मंगल कार्यालयात कोरोना केअर सेंटर सुरु केले होते. तेथे ऑक्सिजनची सुविधा केली. पण, ऐनवेळी व्हेंटिलेर्सची उपलब्धता नव्हती. शिवाय रुग्णाची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला पुन्हा तेथून खासगी रुग्णालयात हलवण्याची वेळ येत होती. या त्रुटी दूर करुन या सेंटरमध्येच अत्यावश्य क यंत्रणा उभा करावी. तज्ज्ञांनी येत्या कोरोनाची लाट वेगाने वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याकडे दुर्लक्ष न करता गेल्या वर्षी झालेल्या चुका टाळण्यासाठी आतापासूनच प्रशासनाने प्रयत्न करावा.
वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळही सज्ज ठेवावे. शिवाय गतवर्षी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी रुग्णांना प्राणास मुकावे लागले होते. यंदा तशी वेळ येवू नये याची दक्षता सर्व यंत्रणानी घ्यावी. शासनाने आरटीपीसीआर तसेच अँटीजेन चाचण्यांचे दर कमी केले ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र रुग्णांना उपचारासाठी लाखो रुपये खर्च करावे लागू नयेत यासाठी उपचाराचे दर कमी करण्यासाठी विचार करावा. तसेच कोरोनाची आणखी एक आवश्यक चाचणी “एचआरसीटी’चे दरही कमी करावेत. शिवाय कोरोनासाठी आवश्याक असलेल्या रेमडेसिव्हर इंजेक्शेनचा गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला होता. त्यामुळे रुग्णांची आर्थिक लूट झाली.
त्यामुळे या इंजेक्शानचा पुरेसा साठा उपलब्ध करुन काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाला तातडीने कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक बाबींची पुर्तता करण्याचे आदेश देण्याकरिता जिल्हाधिकारी यांना विनंती केली. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, सचिव विश्वजीत पाटील, गणपती साळुंखे, मकरंद म्हामुलकर उपस्थित होते.