ठेकेदाराला सापडला पावसाळ्यात मुहूर्त
वार्ताहर/खानापूर
खानापूर तालुक्यातून जात असलेल्या दिघंची – टोप राज्यमार्गाचे करंजे परिसरात काम सुरू करण्यास ठेकेदाराला पावसाळ्यात मुहूर्त सापडला आहे. गेले अनेक दिवसांपासून बंद असलेले काम सुरू करण्यात आले असून ठेकेदाराने शनिवारी चक्क भर पावसात डांबरीकरण करत कार्य तत्परता दाखवली आहे. डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर पाणी साठल्याने निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. मात्र ऐन पावसाळ्यात डांबरीकरणाचा ठेकेदाराचा फंडा बांधकाम विभागाच्या लक्षात आला नाही का असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.
या रस्त्याचे डांबरीकरण होत असताना बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने असा प्रकार होत आहे. डांबरीकरणाचे हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्यावर पाणी साठले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या निकृष्ट रस्त्याची पाहणी करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
Previous Articleदिल्ली : मागील 24 तासात 7 मृत्यू; 135 नवे कोरोना रुग्ण
Next Article ..मग घरातून बाहेर पडलो तर विचार करा : उद्धव ठाकरे








