प्रतिनिधी/हातनूर
श्रीनिवास वसंतराव घेवारी कुटुंबीयांनी तासगाव तालुक्यातील हातनूरचे ग्रामदैवत श्रीहोनाईदेवीच्या येथे वास्तव्यास असणार्या ऊसतोड कुटुंबीयांना 300 ब्लँकेट वाटप केले. दीपोत्सवाची दिवाळी, फराळाची दिवाळी, फटाक्यांची किंवा प्रदूषण मुक्त दिवाळी, आपापल्या घरी गोड-धोड, नवस्त्रालंकारांनी युक्त दिवाळी, यांच्यापेक्षाही आगळीवेगळी एक दिवाळी अनुभवली हातनुर मध्ये ऊसतोडणीसाठी आलेल्या कारेगवण, तालुका‐जिल्हा बीडच्या मजूर कामगारांच्या कुटुंबियांनी.
हातनूरचा पारायण दिंडी सोहळा असो किंवा होनाई देवी पालखी सोहळा, जिल्हा परिषद शाळेची विकास कामे असोत किंवा गावातील कोणताही विधायक उपक्रम. त्याच्यामध्ये मोलाचा वाटा उचलणारे श्रीनिवास वसंतराव घेवारी यांचे सर्वच कुटुंब जितके दिलखुलास तितकेच संवेदनशील.
संवेदनशील घेवारी कुटुंबीयांनी कैलासवासी मातोश्री सुनंदा घेवारी यांचे स्मरणार्थ वडील व प्रत्येक कामामध्ये हिरिरीने साथ सोबत करणाऱ्या सहचारिणी कुसुम तसेच मुलगी श्वेता, सर्वेश व सिद्धार्थ यांच्याशी व बंधू विश्वास वसंत घेवारी, वहिनी तेजश्री यांचेशी केलेल्या चर्चेनंतर घेवारी कुटुंबीय म्हणून या सर्व ऊसतोड कुटुंबियांना तीनशे ब्लॅंकेट वाटण्याचा निर्णय घेतला. व दिवाळीपूर्वी कुटुंबीय व मोजक्या मित्रांसह माजी सरपंच गणेश घेवारी, महाराष्ट्र युवारत्न शशिकांत पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, सहकारी मित्र संजय पाटील, कुटुंबीय व स्वतः तीन ठिकाणी राहत असलेल्या शेतमजुरांच्या राहण्याच्या ठिकाणी जाऊन त्यांना ब्लॅंकेट पोहोचवली.
या आगळ्यावेगळ्या भेटीने व माणुसकीच्या मायेच्या ओलाव्याने गदगद झालेल्या बीडकरांनी आपल्या पूर्ण तोडणी आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग असल्याचे सांगून अगत्याने चहापाणी व कृतज्ञता व्यक्त करीत हातनुर मध्ये घेवारी कुटुंबीयांच्या कडून आलेला अनुभव हा जगावेगळा व माणुसकी आजही जिवंत आहे याचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे सांगितले.
घेवारी कुटुंबीयांच्या कडून आदर्श घेऊन भविष्यामध्ये आपल्या गावामध्ये, तालुक्यामध्ये, आपल्या भागामध्ये जे परप्रांतीय येतील, त्यांचा एक गावकरी म्हणूनच हातनूरकर यापुढेही पाहुणचार करतील असा निर्धार माजी सरपंच सचिन काशिनाथ पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. घेवारी कुटुंबीयांनी दाखवलेल्या आगळ्यावेगळ्या दातृत्वावर संपूर्ण हातनूर परिसरामध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Previous Articleऐनवरेत जनावरे वाहतूक; दोघांवर गुन्हा, टेम्पो जप्त
Next Article बालकल्याण संकुलात मावळयांची दिवाळी








