प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर येथील वाघवाडी फाटा रस्त्यावरील प्रतिक पेट्रोल पंपावर उभा असणाऱ्या ट्रकच्या केबिनला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. वेळ रात्रीची, आग आटोक्यात आणण्यासाठीची अपुरी सुविधा यांमुळे पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांसह या परिसरात राहणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली. पण आरडा-ओरड्याने आजू – बाजूचे नागरिक जागे झाले. त्यांनी नगरपालिकेचा बंब बोलावून आग अटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
हा पेट्रोलपंप मध्यवस्तीत नसला तरी आजूबाजूला मोठी नागरी वस्ती आहे. अनेक साधी व सिमेंट काँक्रीटची घरे आहेत. उद्योग व्यवसाय आहेत. या पंपावर पेट्रोल पंपाच्या मालकांच्या वाहनासह अन्य काही चारचाकी वाहने, ट्रक रात्री थांबून असतात. अशाच एका ट्रकच्या केबिनला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. पेट्रोल पंपावरच हा प्रकार घडल्याने अनेकांचे धाबे दणाणले. या ट्रकच्या पुढे मागे एका आराम बससह अन्य वाहने उभी होती. त्यामुळे धोका मोठा होता.
या ट्रकला लागलेल्या आगीने धुराचे मोठे लोट तयार झाले. या घटनेने काही वेळातच आजूबाजूचे तरुण जागे झाले. त्यांनी पंपाकडे धाव घेतली. शक्य असणारी वाहने हलवली. नागरीकानींच नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून तात्काळ बंब मागवला. ही आग ट्रकच्या केबिनला लागून वाढत चालली होती. मात्र सलग पाण्याचा मारा केल्याने काही वेळात आग आटोक्यात आली. तात्काळ मदत कार्य मिळाले नसते, तर आजूबाजूच्या वाहनांना व पेट्रोल पंपाला झळ पोहचून मोठा अनर्थ घडला असता, मात्र लोकांच्या प्रसंगावधानामळे हा अनर्थ टळला.








