भारताचा फिडे मास्टर जुबिन जिम्मी द्वितीय स्थानी
सांगली / प्रतिनिधी :
पुरोहित चेस अकॅडमी, सांगली यांच्या तर्फे आयोजित केल्या गेलेल्या ऑनलाईन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेमध्ये भारतासह तुर्कमेनिस्तान, ईजराईल, सर्बिया, अर्जेंटिना, जॉर्जिया, इराण, युक्रेन, अर्मेनिया, उझबेकिस्तान, रशिया यांसह अनेक देशांतील ग्रँडमास्टर्स, इंटरनॅशनल मास्टर्स, फिडे मास्टर्स सहभागी झाले होते. ही स्पर्धा सांगली डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे सेक्रेटरी आणि महाराष्ट्र चेस असोसिएशनचे जॉइन्ट सेक्रेटरी चंद्रकांत वळवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली गेली. इराणचा मानांकित खेळाडू नवाझ अली हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने ९५ गुणांसह विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत केरळचा फिडे मास्टर जुबिन जिम्मी हा ८५ गुणांसह उपविजेता ठरला. भारताचा ग्रँडमास्टर आर आर लक्ष्मण यास ८४ गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. पश्चिम बंगालचा मानांकित खेळाडू सुभयान कुंदू यास ७० गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. दिल्लीचा फिडे मास्टर आर्यन वार्षणे यास यास ६७ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले.
पुरोहित चेस अकॅडमीचे प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली गेली. तसेच चंद्रकांत वळवडे यांच्यामार्फत ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली. तांत्रिक पंच म्हणून चंद्रशेखर कोरवी, दीपक वायचळ आणि शार्दूल तपासे यांनी काम पाहिले.








