आष्टा / वार्ताहर
आष्टा येथील सुप्रसिध्द मेसर्स कोपर्डे कापड शोरुम शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. या घटनेत चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले. 31 जानेवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
रविवारी रात्री बाराच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे कोपर्डे शोरूमला आग लागली. शोरूममध्ये कपडे तसेच लाकडी फर्निचर असल्याने आगीचा भडका वाढत गेला. जाळाचे लोट उठू लागले. शेजारील नागरिकांना ही घटना लक्षात आली. नागरिकांनी तात्काळ इस्लामपूर नगरपालिका, सांगली मिरज कुपवाड महापालिका, राजारामबापू साखर कारखाना, हुतात्मा साखर कारखाना, आष्टा पालिकेच्या अग्निशमन दलास घटनास्थळी बोलावून घेतले. सात अग्निशमन गाड्याच्या माध्यमातून आग विझविण्याचे काम सुरू होते तरीही आग आटोक्यात येत नव्हती. सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली तोपर्यंत, संपूर्ण शोरूम जळून खाक झाले होते.
कोट्यवधी रुपयांचे कपडे आगीच्या भक्षस्थानी पडले होते. शोरूम मधील फर्निचरही जळून खाक झाले. आगीमुळे इमारतीचे ही मोठे नुकसान झाले. घटनास्थळी तात्काळ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, नगरसेवक धैर्यशील शिंदे, शैलेश सावंत यांनी भेट दिली आणि अग्निशमन दलास सुचना दिल्या. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत होती.