प्रतिनिधी / सांगली
पलुस तालुक्यातील आमणापूर येथील नदीपासून सुमारे ३ किलोमीटरवर शिवारात वावरणारी मगर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. काळा ओढा परिसरात काल रात्री येळावी-आमणापूर रोड, धनगांव-बोरजाईनगर मार्गावर तसेच आजूबाजूला शिवारात, फडतरे मळ्यात ही मगर वावरताना अनेक नागरिकांना पहायला मिळाली.
या मगरीला पहाण्यासाठी बोरजाईनगर, धनगांव, आमणापूर, अनुगडेवाडी येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत वन विभागाला कल्पना देण्यात आली आहे. रविवारी सकाळी वनक्षेत्रपाल कडेगाव पलुस पल्लवी चव्हाण, वनपाल मारुती ढेरे, वनरक्षक शहाजी ठवरे यांनी या परिसरात भेट देऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना दक्ष राहण्याची सुचना देण्यात आली आहे.