सांगली / प्रतिनिधी
सांगली शहर पोलिसांना कृष्णा नदीत बंधार्यावर सांगलीवाडीच्या बाजूला पोत्यात घातलेला मृतदेह तरंगत असल्याची माहिती शुक्रवारी मिळाली होती. हा मृतदेह शिवाप्पा बसप्पा केलगडे वय 38 रा, सांगलीवाडी याचा असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला त्यावेळी हा खून शिवाजी शिंगे आणि हणमंत पुजारी रा. सांगलवाडी यांनी केल्याची कबुली दिली आहे. अवघ्या सहा तासात खुनाचा छडा सांगली शहर पोलिसांनी लावला आहे.
शुक्रवारी कृष्णा नदीच्या जुना बंधारा धरणावर पोत्यात बांधलेला मृतदेह अडकला होता. यावेळी जीवरक्षक टीमला मदतीसाठी बोलवले. टीमचे महंमद तांबोळी व सदस्य घटनास्थळी आले. पोते बाहेर काढण्यात आले. तेव्हा आतमध्ये मृतदेह आढळला. अंदाजे 40 वर्षाच्या व्यक्तीच्या गळ्यावर वार केल्याचे दिसले. खुनानंतर मृतदेह पोत्यात कोंबून आतमध्ये मोठा दगड टाकून पोते बांधून नदीत टाकण्यात आले आहे. मृताच्या अंगावर काळी पॅन्ट व चौकडा शर्ट आहे. तसेच हातात व पायात काळा दोरा आहे. ओळखपत्र वगैरे काही मिळाले नाही. त्यामुळे ओळख पटली नव्हती पण पोलिसांनी बेपत्ता व्यक्ती चा फोटो पाहून तपास केल्यानंतर हा मृतदेह शिवाप्पा बसप्पा केलगडे याचा असल्याचे आढळून आले आणि तपास कामास गती आली व सहा तासात दोघा संशयिताना अटक करून हा तपास पूर्ण झाला. निरीक्षक अजय सिंदकर आणि सहा. पोलिस निरीक्षक निलेश बागाव यांनी हा तपास केला.