वार्ताहर / आष्टा
राज्यात व जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोना बाधित सर्व रुग्णांनी सकारात्मक विचार करावा, जिल्ह्यातील डॉक्टरांची संख्या मर्यादित असल्याने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. जिवाची बाजी लावून रूग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावेत. आपल्या जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंत पाटील यांनी केले.
आष्टा येथील मा.श्री. अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयाचे धन्वंतरी हॉस्पिटल, तसेच आष्टा येथील क्रिटीकेअर हॉस्पिटल, स्पंदन हॉस्पिटल, कृष्णामाई हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने व सेवासदन हॉस्पिटल प्रा. लि. चे संचालक डॉ. रविकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री. अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय संलग्नित धन्वंतरी हॉस्पिटल आष्टा येथे ५० बेडचे ‘आष्टा कोविड सेंटर’ सुरू करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री जयंत पाटील बोलत होते. माजी मंत्री व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्षा स्नेहा माळी, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, यांच्यासह शहर व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
मंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्रात बेड अभावी अनेक रुग्णांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे हे परवडणारे नाही. त्यासाठी कुणाची भीती न बाळगता त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. डॉक्टरांनी सर्वसामान्य नागरिकांना समुपदेशनसह आधार देण्याची गरज आहे. यासाठी रुग्णाची पल्सऑक्सीमीटरच्या साह्याने ऑक्सिजनची तपासणी करून घ्यावी. ९० च्यावर असणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची आवश्यकता नाही, घरच्या घरी उपचार घेऊन सुद्धा कोरोनावर मात करू शकतात.
अण्णासाहेब डांगे म्हणाले ,’वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी आमचे महाविद्यालय संलग्नित हॉस्पिटल आष्टा व परिसरात सुविधा देत आहे. ही सुविधा गरजू रुग्णांना निश्चितच दिलासादायक आहे. आष्टा कोविड सेंटरचे चीफ ॲडमिनीस्ट्रेटर, आणि आष्टा डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोळी यांनी सर्व डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले व रुग्णांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील, गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे, मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण, डॉ.सुमीत कबाडे, डॉ.सुजय कबाडे, डॉ.संतोष व्हटकर, डॉ.जोतिराम मस्के पाटील, डॉ.विनायक माने, डॉ.मिलिंद संपकाळ, डॉ.सचिन पाटील, डॉ.सुनिल मस्के पाटील, डॉ.धर्मेंद्र पाटील, डॉ दिलीप कटरे आदी डॉक्टर्स उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक ॲड. चिमण डांगे यांनी केले. आभार ॲड.संपतराव पाटील यांनी मानले.महाविद्यालयातील अध्यापक तसेच हॉस्पिटल डॉक्टर्स व कर्मचारी यांनी संयोजन केले.
Previous Articleधोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे जलपूजन
Next Article बेंगळूर: कोरोनामुक्त महिलेला पुन्हा कोरोनाची बाधा








