प्रतिनिधी / ओरोस:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खोळंबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे शासनाने निश्चित केल्यानंतर पहिल्या टप्प्यात जिल्हय़ातील 84 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
राज्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर थांबल्या होत्या. आता कोरोनाचा प्रभाव थोडा कमी झाल्यावर बिहार विधानसभा निवडणूक आणि राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण झाल्या. त्यानंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कोरोना लॉकडाऊनपूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या 84 संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.
या 84 संस्थांपैकी उपनिबंधक कार्यालय अंतर्गत असलेल्या 78 संस्था तसेच पशु, दुग्ध आणि मत्स्य विकास अंतर्गतच्या सहा संस्था यांचा या पहिल्या टप्प्यामध्ये समावेश आहे. लॉकडाऊनपूर्वी उपनिबंधक कार्यालयाशी संबंधित असलेल्या 78 संस्थांपैकी पाच संस्थांची अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. तर 40 संस्थांची प्रारुप मतदार यादी जाहीर होऊन त्यावर आक्षेप नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या 78 मध्ये ‘ब’ वर्गातील 45, ‘क’ वर्गातील 18 आणि ‘ड’ वर्गातील 15 संस्थांचा समावेश आहे.
जिल्हा बँकेसाठी 1177 मतदार संस्था
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अ वर्गात येत असून पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमात तिचा समावेश करण्यात आलेला नाही. ही निवडणूक दुसऱया टप्प्यात होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्हय़ातील तब्बल 1 हजार 177 एवढय़ा मतदार संस्था आहेत. यात दुग्ध, पशु आणि मत्स्य विभागांच्या संस्था तसेच धर्मादाय विभागातील संस्थांचा समावेश आहे. या 1 हजार 177 मतदार संस्थांपैकी 720 मतदार संस्थांनी मतदानाचे ठराव यापूर्वीच करून दिले आहेत. तर अजून 457 संस्थांचे ठराव येणे बाकी आहेत. ठराव प्राप्त झालेल्या 720 संस्थांपैकी कोणी मयत सभासद मतदार असेल किंवा एखाद्या संस्थेची नव्याने निवड होऊन नवीन सभासद, संचालक निवडून आले असतील, तर अशांनी पुन्हा ठराव करून पाठवावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहकारी संस्था यांनी केले आहे.









