बाजारभोगाव परिमंडल वनाधिकारी कार्यालयाची कारवाई
बाजारभोगाव / वार्ताहर
पोहाळवाडी (ता. पन्हाळा ) येथील वनक्षेत्रात रविवारी सशाची शिकार करून परत येणाऱ्या दोघा तरूणांना बाजारभोगाव परिमंडल वनाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वनहद्दीत मृत सशासह रंगेहाथ पकडले. यावेळी आरोपींबरोबर वनरक्षक कुंडलीक कांबळे यांची झटापट झाली. त्यापैकी एक आरोपी पळून गेला. सोमवारी याप्रकरणी संशयीत नितीन तुकाराम साळवी ( वय २७, रा. बाजारभोगाव पैकी मोताईवाडी, ता. पन्हाळा ) व महादेव आनंदा पाटील (वय ३७, रा. माळापुडे, ता. शाहूवाडी ) यांना अटक करण्यात आली आहे.
रविवारी ३ एप्रिल रोजी दुपारी वनकर्मचाऱ्यांना या शिकारीबाबत गुप्त माहीती मिळाली. त्यानुसार सापळा रचला आला. मध्यरात्री वनहद्दीतून सशाची शिकार करून निघालेल्या दोघा तरूणांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी वनरक्षक कुंडलीक कांबळे यांच्याशी झटापट झाली. यावेळी हिसडा मारून महादेव पाटील हा तरूण पळून जाण्यात यशस्वी झाला. तर नितीन साळवी याला मृत सशासह पकडण्यात आले. सोमवारी सकाळी सहाय्यक वनसंरक्षक सुनिल निकम व पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज कांबळे यांनी मृत सस्याचे शवविच्छेदन केले असतात त्याच्या शरीरात दोन छरे आढळून आले.
या दोघाही आरोपींना पकडण्यात वनपाल नाथा पाटील, वनरक्षक कुंडलीक कांबळे, महादेव कुंभार, वनमजूर नाथा पाटील, भुजंगा पाटील, शंकर पाटील यांच्या पथकाने परिश्रम घेतले. त्यांच्याकडून मृत सशासह कुऱ्हाड, पारळी, दोन बॅटऱ्या, मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघा आरोपींना कळे येथील न्यायालयात हजर करून त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.