अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार, 2 ऑगस्ट 2021, स. 11.15
● रविवारी अहवालात 644 बाधित ● एकूण 8,801 जणांची तपासणी ● पॉझिटिव्हिटी दराचा उल्लेख नाही ● लसीकरणात सातत्य नाही ● खाजगी ठिकाणी लसीची किंमत जास्त
सातारा / प्रतिनिधी :
दर रविवारी बाधित वाढीचा वेग मंदावतो, असा अनुभव नेहमीच होता व आहे. यावेळी मात्र रविवारी देखील बाधित वाढ मंदावली व सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी देखील बाधित वाढ मंदावण्याचा दिलासा लाभला आहे. मात्र तीन अंकी संख्येने सुरू असलेली वाढ कायमच आहे. मृत्यू दराचे नक्की आकडे प्रशासनाने जाहीर करायला हवेत आणि एकूण कामातच पारदर्शीपणा यायला हवा, अशी नागरिकांची मागणी आहे.
रविवारी रात्री अहवालात 644 बाधित
सोमवारी सकाळी आलेल्या अहवालात सलग दुसऱ्या दिवशी बाधित वाढ कमी झाल्याचा दिलासा लाभला असून रविवारी रात्रीच्या अहवालात आलेल्या माहितीनुसार एकूण 8,801 जणांची तपासणी झाली असून, यामध्ये 644 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर किती याची नोंद नाही.
कोरोना मुक्तीचा आलेख खाली आला
गेल्या आठवडाभरात ज्या पद्धतीने तीन अंकी संख्येने बाधित वाढ होत आहे. मात्र बाधित वाढीच्या प्रमाणात कोरोना मुक्ती होत नाही. त्यामुळे उपचारार्थ रुग्ण संख्या वाढत आहे. प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये सुमारे दोन हजार रुग्ण उपचार घेत आहेत व जिल्ह्यात सुमारे आठ ते नऊ हजार रुग्ण ज्यांना काही लक्षणे नाहीत ते जिल्ह्यात होमआयसोलेटेड असल्याची सद्यस्थिती आहे. ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटर बेड साठी होणारी यातायात थांबली असली तरी जिल्ह्यात सध्या पावसामुळे सर्दी ताप खोकला अशी लक्षणे असलेले रुग्ण समोर येत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. आले की त्यांना टेस्टिंग करा सांगितले जात असल्याने अनेक नागरिक दवाखान्यात जाण्याची टाळत आहेत. त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्यावर उपचार तरी सुरू करा, टेस्टिंगची भीती घालू नका, अशी नागरिकांची मागणी आहे.
लस आली पण घेण्यासाठी मारामारी
जिल्ह्यात आता काही प्रमाणात लशीचा साठा उपलब्ध झालेला आहे. मात्र शासकीय लस फुकट मिळते त्यामुळे ती घेण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ आहे त्यासाठी काही राजकीय मंडळीदेखील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ठाण मांडून बसत आहेत. त्यात पुन्हा मग वशिलेबाजी, लस पळवापळवी असे प्रकार घडत आहेत. काही खाजगी दवाखान्यात उपलब्ध असलेली लस. तिची किंमत साडेसातशे ते दीड हजार रुपयांपर्यंत आकारण्यात येत आहे आहे. त्यामुळे मग सहाजिकच नागरिकांना शासकीय लस हवी आहे. त्यामुळे शासनाने खाजगी ठिकाणी लसीकरण सुरू आहे तिथे किफायतशीर किंमतीत लस उपलब्ध होऊ शकते का याचा आढावा घेऊन काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.
रविवारी जिल्ह्यात बाधित – 675, मृत्यू – 15, मुक्त – 330
रविवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमूने – 14,20,865, एकूण बाधित – 2,19,684, घरी सोडण्यात आलेले – 2,05,848, मृत्यू – 5,312, उपचारार्थ रुग्ण-11,021









