‘गोवा माईल्स’ टॅक्सींनादेखील सक्ती : वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
येत्या 1 मे पासून डिजिटल मीटर्स बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार असून ते सर्व टॅक्सांना बंधनकारक आहे. गोवा माईल्स टॅक्सींनादेखील ते बसवावे लागतील, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले आहे.
गोवा माईल्स सुरू करताना आपणास तसेच कोणालाच विश्वासात घेतले नसल्याची कबुली त्यांनी दिली. दाबोळी विमानतळावरही गोवा माईल्स काऊंटर सुरू करताना आपणास विचारण्यात आले नसल्याचे ते म्हणाले. सरकारतर्फे मीटर्स मोफत देण्याची तयारी त्यांनी दर्शविली असून सर्व टॅक्सीवाल्यांनी ते बसवावे, असे आवाहन त्यांनी केले.
पर्वरी येथील मंत्रालायात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री गुदिन्हो यांनी वरील माहिती देऊन सांगितले की, डिजिटल मीटर्स बसवणे ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे प्रवासी पर्यटकांना योग्य तो परवडणारा दर मिळेल आणि त्यांची लूटमार होणार नाही. टॅक्सी दरात पारदर्शकता येणार आहे. गोवा माईल्स सेवा रद्द करण्याची मागणी एका झटक्यात पूर्ण करणे शक्य नाही. याचे भान टॅक्सीवाल्यांनी ठेवावे. उद्या गोवा माईल्स रद्द केले आणि ते कोर्टात गेले व स्थगिती मिळविली तर ते पुन्हा गोव्यात कायमचे उरले आणि टॅक्सीवाले संपले, अशी परिस्थिती होऊ शकते, याची जाणीव टॅक्सीवाल्यांना करून दिल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले.
टॅक्सीवाल्यांचे म्हणणे आपण ऐकून घेतले आणि त्यांना संप मागे घेण्याचे आवाहनही केले. सरकारवर विश्वास ठेवा, असे सांगून तुमचे प्रश्न सोडवितो, असे आश्वासनही दिले. परंतु टॅक्सीवाले ऐकायला तयार नाहीत. त्यांनी त्यांचे आंदोलन चालूच ठेवल्याची माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली.
टॅक्सी संघटनेचे आंदोलन सुरूच
संपकरी टॅक्सीवाले आणि वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली असून त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने टॅक्सीवाल्यांनी आंदोलन पुढे चालूच ठेवण्याचे निश्चित केले आहे. एक महिना तरी आंदोलन करू नका, सरकार टॅक्सीवाल्यांच्या हिताचा निर्णय घेईल, अशी विनवणी मंत्री गुदिन्हो यांनी केली. पण टॅक्सीवाल्यांनी फेटाळून लावली. गोवा माईल्स सेवा रद्द करावी या मागणीवर टॅक्सीवाले ठाम राहिले असून ते माघार घेण्यास तयार नसल्याचे सांगण्यात आले.









