
राज्यासह बोर्डात सिंधुदुर्गचा आजपर्यंतचा विक्रमी निकाल : पाच विद्यार्थिनी शंभर टक्के गुणांसह नंबर एकवर
- शंभर टक्के निकाल देणाऱया शाळांची संख्याही विक्रमी
- कृतिशिल अभ्यासक्रमामुळे टक्केवारी वाढली – जिल्हा शिक्षणाधिकारी
- जिल्हय़ात वेंगुर्ले तालुका 99.56 टक्के निकालासह अव्वल
प्रतिनिधी / ओरोस:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. अपेक्षेप्रमाणे 98.93 टक्के निकालासह सिंधुदुर्ग जिल्हा कोकण बोर्डात व संपूर्ण राज्यातही अव्वल ठरला आहे. कोकण विभागाने 98.77 टक्के निकाल नोंदवत सलग नवव्या वर्षी राज्यात अग्रस्थानी राहण्याचा बहुमान संपादन करीत एक नवा कीर्तीमान स्थापन केला आहे. यावर्षीचा कोकण बोर्डाचा आणि जिल्हय़ाचाही निकाल हा बोर्डाच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा सर्वोच्च निकाल ठरला आहे, हे विशेष.
कुडाळ हायस्कूलची आस्था आनंद मर्गज, कणकवली विद्यामंदिर हायस्कूलच्या सिद्धी सुरेंद्र मोरे व श्रावणी राजेंद्र मणचेकर, कासार्डे हायस्कूलची मृण्मयी विजयानंद गायकवाड तसेच आयडियल इंग्लिश स्कूल वरवडेची प्राची अनिल तायशेटे या पाच विद्यार्थिनी 100 टक्के गुण मिळवत जिल्हय़ात प्रथम आल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हय़ातून मार्च 2020 च्या दहावी परीक्षेला एकूण 11180 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 11060 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 5358 मुली, तर 5702 मुलांचा समावेश आहे. उत्तीर्णांच्या टक्केवारीत मुलगे (98.60 टक्के) काहीसे मागे असून अपेक्षेप्रमाणे मुलींनी (99.28 टक्के ) बाजी मारली आहे.
यावर्षी निकालाच्या टक्केवारीत भरघोस वाढ
मागील सहा वर्षांच्या तुलनेत गतवर्षी निकालाचा टक्का धक्कादायकरित्या घसरला होता. हा धक्का सिंधुदुर्गसह संपूर्ण राज्याला बसला होता. कारण राज्य व कोकण बोर्डाचा मागील पाच वर्षांतील निकालाचा तो नीचांक होता. मात्र यावर्षी सकारात्मक धक्का देत सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकण बोर्डाने देखील राज्यात नवा कीर्तीमान स्थापन करीत अभूतपूर्व असे यश मिळवले आहे. गतवर्षी कोकण बोर्डाचा निकाल 88.38 टक्के लागला होता. यावर्षी तो 98.77 टक्क्यावर पोहोचला. तर गतवर्षी जिल्हय़ाचा निकाल 91.24 टक्के लागला होता. तो 98.93 टक्क्यांवर पोहोचला आहे. गत सहा वर्षांच्या निकालातील हा आजपर्यंतचा सर्वोत्तम निकाल ठरला आहे.
राज्यातील पहिल्या दहा जिल्हय़ांमध्ये 1. सिंधुदुर्ग (98.93), 2. रत्नागिरी (98.69), 3. कोल्हापूर (98.21), 4. पुणे (97.93), 5. सोलापूर (97.53), 6. मुंबई उपनगर 1 (97.30), 7. सातारा (97.25), 8. सांगली (97.22), 9. मुंबई ग्रामीण (97.10), 10. पालघर (96.73) आदी जिल्हय़ांचा समावेश आहे.
यावर्षी 100 टक्के निकाल लावणाऱया शाळांचा अनोखा विक्रम
जिल्हय़ात यावर्षी 228 शाळांपैकी 171 शाळांनी निकाल 100 टक्के नोंदवला आहे. गतवर्षी केवळ 43 शाळांचा 100 टक्के निकालात समावेश होता.
कृतिशिल पॅटर्नमुळे निकालात वाढ – जिल्हाशिक्षणाधिकारी
कोरोनाची पार्श्वभूमी आणि शेवटचा भूगोलचा पेपर रद्द केला गेलेला असताना देखील यावर्षीच्या निकालाच्या टक्केवारीत जी आश्चर्यकारक वाढ झाली, त्याबाबत शिक्षण खात्याच्या माध्यमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, गतवर्षीपासून दहावीच्या अभ्यासक्रमाच्या पॅटर्नमध्ये बदल करण्यात आला आहे. या नव्या पॅटर्नमध्ये कृतिशिल अभ्यासावर भर देण्यात आला आहे. या पद्धतीमुळे नुसती घोकमपट्टी करण्याऐवजी मुले समजून घेऊन अभ्यास करतात आणि त्याचा फायदा गुणांवरदेखील होतो. पहिल्या वर्षी ही पद्धत समजून घेण्यात मुलांचा आणि शिक्षकांचा थोडा गोंधळ उडाला होता आणि त्यामुळे एकूण निकालाची टक्केवारी घसरली होती. यावर्षी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ही नवीन अभ्यासाची पद्धती व्यवस्थित समजून घेतल्यामुळे एकंदर विद्यार्थ्यांच्या आणि जिल्हय़ाच्या निकालावर हा सकारात्मक परिणाम दिसून आला. आपल्या या जिल्हय़ाने यावर्षी अव्वल क्रमांक हा राखलाच, पण त्याचबरोबर विक्रमी कामगिरीही नोंदविल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे ते म्हणाले.
जिल्हय़ाच्या तालुकानिहाय निकालाची टक्केवारी
गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वेंगुर्ले तालुक्याने 99.56 टक्के निकाल नोंदवत निकालात जिल्हय़ात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर वैभववाडी तालुक्याने थक्क करणारी कामगिरी नोंदवत मागील वर्षीच्या सातव्या क्रमांकावरून थेट द्वितीय क्रमांकावर झेप घेतली आहे.
1. वेंगुर्ले 99.56
2. वैभववाडी 99.32
3. सावंतवाडी 99.08
4. कणकवली 99.07
5. मालवण 99.04
6. कुडाळ 98.73
7. देवगड 98.36
8. दोडामार्ग 98.34
राज्याचा विभागनिहाय निकाल
विभाग टक्केवारी
1. कोकण 98.77
2. कोल्हापूर 97.64
3. पुणे 97.34
4. मुंबई 96.72
5. अमरावती 95.14
6. नागपूर 93.84
7. नाशिक 93.73
8. औरंगाबाद 92.00









