माजी आमदार दिगंबर पाटील : 75 वर्षे पूर्ण केलेल्या मराठी शिक्षकांचा अमृतमहोत्सव उत्साहात
वार्ताहर / खानापूर
आजच्या शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल झाले आहेत. पूर्वी दळणवळणाची सुविधा नसतानाही अनेक शिक्षकांनी स्वतःमध्ये त्यागाची भूमिका घेत समाज घडविण्याचे काम केले. प्रामाणिक सेवा करत म. ए. समितीच्या कार्यात अनेक शिक्षकांनी योगदान दिले आहे. मराठीचे जतन व मराठी संस्कृती वाढविण्यासाठी शिक्षकांनी मोठी जबाबदारी पेलली आहे. त्यामुळे शिक्षक हा समाजातील पूजनीय घटक आहे. आज अशा अनेक शिक्षकांना 75 वर्षे पूर्ण होऊन त्यांची शताब्दीकडे वाटचाल सुरू आहे. खानापूर तालुक्मयातील सेवानिवृत्त शिक्षकांनी हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद आहे. गेल्या 11 वर्षात निवृत्त शिक्षकांना ऊर्जा देण्याचे काम तालुका मराठी प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक संघटना करत असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार दिगंबर पाटील यांनी गुरुवारी खानापुरात निवृत्त शिक्षक संघटनेच्यावतीने आयोजित अकराव्या अमृतमहोत्सव सोहळय़ात व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी तालुका मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष डी.एम. भोसले होते. निवृत्त शिक्षक गोपाळ हेब्बाळकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविक ए.एम. पाटील यांनी करून गेल्या वर्षभरात दिवंगत झालेल्या सेवानिवृत शिक्षक तसेच सैनिक दलाचे प्रमुख बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात दीपप्रज्वलन माजी आमदार दिगंबर पाटील, माचीगड साहित्य अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. बनोशी, समितीचे माजी अध्यक्ष विलास बेळगावकर यांच्या हस्ते झाले. सरस्वती फोटोपूजन व डॉ. राधाकृष्ण फोटोपूजन भू-विकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, समिती नेते प्रकाश चव्हाण तसेच प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष ए. बी. मुरगोड यांच्या हस्ते झाले.
अमृतमहोत्सवी शिक्षकांचा सत्कार
खानापूर तालुका सेवानिवृत्त मराठी प्राथमिक शिक्षक व यावषी 75 वर्षे पूर्ण केलेल्या संभाजी मो. गुरव लोकोळी, तम्माण्णा गावडे खानापूर, शिवराम व्ही. जाधव माचीगड, टी.वाय. पाटील क-नंदगड यांचा अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात निवृत्त माध्यमिक शिक्षक व शिवस्मारक ट्रस्टचे अध्यक्ष एम.पी. पाटील यांचा तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खानापूर सांस्कृतिक प्रति÷ानचे संस्थापक अध्यक्ष नारायण कापोलकर यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षकांनी गेल्या 11 वर्षात हाती घेतलेले कार्य अभिनंदनीय असून निवृत्त शिक्षकांना ऊर्जा देण्याचे कार्य या संघटनेने हाती घेतले असल्याचे बाबुराव पाटील यांनी सांगितले. यावेळी विलास बेळगावकर, मुरलीधर पाटील, नारायण कापोलकर, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, टी. वाय. पाटील आदींनी विचार मांडले.
व्यासपीठावर जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई, ता. पं. माजी सदस्य बाळासाहेब शेलार, विठ्ठल गुरव, गर्लगुंजी ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील, ज्ये÷ शिक्षक महादेव गावडा, ज्ये÷ नागरिक संघटनेचे सेपेटरी सी. एस. पवार, प्रा. शंकर गावडा आदी उपस्थित होते.