इमारत-मैदानाची दुरवस्था : मैदानात दारूच्या बाटल्यांचा खच : प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील उद्याने व मैदाने सध्या मद्यपींचे अड्डे बनले आहेत. अंधाराचा फायदा घेत मद्यपींच्या अशा ठिकाणी पाटर्य़ा रंगत आहेत. लॉकडाऊनच्या काळात तर या गोष्टीला मोठय़ा प्रमाणात उधाण आले होते. नशेत दारूच्या बाटल्या फोडून त्या ठिकाणी धिंगाणा घालण्याचे प्रकारही वाढल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहेत. सरदार्स ग्राऊंडवरही हा प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी मद्यपी दारू पिऊन मैदानात दारूच्या बाटल्या फोडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन या ठिकाणी होत असलेले गैरप्रकार थांबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
एक कोटी चार लाख रुपये खर्च करून सरदार्स ग्राऊंडवर क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. याचा फायदा स्थानिक क्रिकेटप्रेमींना व्हावा, तसेच या मैदानावर अनेक क्रिकेटपटू घडावेत, हा उद्देश होता. मात्र असे न होता या मैदानावर अनेक गैरप्रकार चालू आहेत. मद्यपान करून फेकलेल्या बाटल्या, सिगारेट, प्लास्टिकच्या पिशव्या, गुटखा, स्टार, तंबाखू यासारखी अनेक रिकामी पाकिटे टाकण्यात आली आहेत.
पान खाऊन सर्व भिंती गलिच्छ करण्यात आल्या असून इमारतीच्या काचा फोडून नासधूसही करण्यात आली आहे. त्यामुळे अक्षरशः येथील इमारतीची व मैदानाची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे संबंधित खात्याने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
सरदार्स ग्राऊंडवर सकाळ-संध्याकाळ अनेक मुले क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल यासारखे खेळ खेळण्यासाठी येत असतात. सध्या शाळा बंद असल्यामुळे मैदानावर लहान मुलांची गर्दी मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणी फोडलेल्या बाटल्यांच्या काचा मुलांच्या पायांना लागून गंभीर दुखापती होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक गेटवर सेक्मयुरिटी गार्डची व्यवस्था करावी, अथवा सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. जेणेकरून मैदानात होत असलेले गैरप्रकार थांबतील, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









