वार्ताहर/ मौजेदापोली
निसर्ग चक्रीवादळातील बाधितांसाठी जुन्या फळबाग योजनांचे नियम व अटींमध्ये शिथिलता आणून कोकणातील बागायतदारांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जात आहे. तसेच सरकार निसर्ग चक्रीवादळातील बाधित बागायतदारांच्या पाठीशी ठाम असल्याची ग्वाही फलोत्पादन, पर्यटन व क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
तटकरे या दापोली दौऱयावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शासकीय अधिकारी, स्थानिक पदाधिकारी यांच्यामवेत निसर्ग चक्रीवादळ तसेच कोरोना या विषयांवर आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील आदी अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीनंतर तटकरे पत्रकारांशी बोलताना तटकरे पुढे म्हणाल्या की, निसर्ग चक्रीवादळाचा फटका दापोली व मंडणगडला अधिक बसला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर विविध योजनांमध्ये बदल करून त्याअनुषंगाने अधिक नुकसान भरपाई वाढवून देण्यात आली आहे. यात पूर्णत: घरांच्या नुकसानीसाठी 95 हजारऐवजी 1 लाख 50 हजार रूपये, अन्नधान्य नुकसानीसाठी 2500 ऐवजी दुप्पट 5 हजार केले. आहेत. या वादळाचा अधिक फटका बागायतदारांना बसला. बागायदारांना 50 हजार हेक्टरी नुकसान भरपाई राज्य शासनाने पूर्वीच्या निकषामध्ये बदल करून जाहीर केली. जुनी रोजगार हमी योजना लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीनुसार नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुनरूज्जीवित करण्यात आली आहे. त्यामध्ये सुपारी व कोकम या दोन फळांचा नव्याने या योजनेत समावेश करण्यात आला आहे. याआधी काजू, आंबा, नारळ, चिकू या फळझाडांचा या योजनेत समावेश होता. तसेच सुपारीला 50 रूपये, तर नारळाला 250 रूपये अशी नुकसानभरपाई देण्याचे नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी जिल्हय़ातील पर्यटन क्षेत्रालादेखील मोठा फटका बसला आहे. हा व्यवसाय कशाप्रकारे पूर्वपदावर आणला पाहिजे यासाठी नागरिक, पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून सूचना प्राप्त करून शासनदरबारी मांडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पर्यटनाची प्रचलित ठिकाणे असून तिथे मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. जिथे अधिक पर्यटकांची गर्दी असते अशाठिकाणी लवकरात लवकर या मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
दापोलीत क्रीडा विभागाची जागा आहे. ती कशाप्रकारे विकसित करू शकतो याचा प्रस्तावदेखील शनिवारी दापोलीत झालेल्या बैठकीत मागवण्यात आला आहे. हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर खेलो इंडिया अथवा इतर योजनेच्या माध्यमातून निधी मिळवून देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. दापोलीत 2011 साली क्रीडा कार्यालयाची इमारत बांधण्यात आली आहे, परंतु ती वापरात न येता नादुरूस्त झालेली आहे. यासंदर्भातही माहिती मागवण्यात आली आहे. ती प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कोकण कृषी विद्यापाठाने बाधित क्षेत्र दत्तक घेऊन बागायतींचे पुनर्वसन करावे, असेही तटकरे यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, उपसभापती ममता शिंदे, माजी सभापती राजेश गुजर, नगराध्यक्षा परवीन शेख, जि. प. सदस्य मोहन मुळे आदी उपस्थित होते.









