प्रतिनिधी / पणजी
कला व संस्कृती संचालनालय व पर्यटन खात्याच्या सहकार्याने सांखळी येथे वाळवंटी नदिकिनारी सरकारी पातळीवर होणारा वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला आहे. मात्र मंदिरातर्फे होणारा धार्मिक व पारंपरिक सोहळा चालूच राहणार आहे.
गेली कित्येक वर्षे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव राज्य पातळीवर साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या प्रभावामुळे सरकारी पातळीवरील सर्व कार्याक्रम रद्द करण्यात आले. त्यात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचा देखील समावेश आहे. सरकारने सोमवारी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.
दरम्यान, मंदिरातर्फे वार्षिक व पारंपरिक पद्धतीने होणारा पालखी उत्सव होणार आहे. आसपासच्या परिसरातील बालक व युवा मंडळी छोटय़ा-छोटय़ा नौका तयार करून ते वाळवंटी नदीत सोडतील तसेच महिलावर्ग पारंपरिक पद्धतीने वाळवंटीमध्ये दीपदान करतील. यंदाच्या पारंपरिक कार्यक्रमाच्या वेळी कोणाही गर्दी करून नये, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. यंदा स्पर्धा होणार नाही, त्याचबरोबर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही, असे दीपावली उत्सव समिती सांखळीतर्फे अरुण नाईक यांनी कळविले आहे.









