12 मे पर्यंत आदेश जारी : गृह, आरोग्य, महसूल खात्यातील कर्मचाऱयांना मात्र,100 टक्के हजेरी अनिवार्य
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी राज्यात मंगळवारी रात्रीपासून 14 दिवसांसाठी क्लोजडाऊन जारी करण्यात आला आहे. या कालावधीत कठोर नियम लागू असणार असून सरकारी कार्यालयीन कर्मचाऱयांच्या उपस्थितीसंबंधी देखील मार्गसूची जारी करण्यात आली आहे. त्यानुसार महसूल, गृह, अंतर्गत प्रशासन, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण खात्यातील कार्यालयांमध्ये कर्मचारी आण अधिकाऱयांच्या 100 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर उर्वरित खाती, निगम-महामंडळे, प्राधिकरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱयांची उपस्थिती असू नये, असा आदेश देण्यात आला आहे.
राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी कोरोना कर्फ्यू जारी असल्याने 12 मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित कार्यालयांमधील कर्मचाऱयांची 50 टक्के ठेवण्याचा आदेश दिला आहे. उर्वरित कर्मचाऱयांना अनुकूलतेनुसार कोरोना नियंत्रणासंबंधिच्या कामांसाठी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱया आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच महसूल, अंतर्गत प्रशासन विभागातील कर्मचाऱयांची 100 टक्के उपस्थिती राहण्यास मुभा देण्यात आली आहे. तर ग्रामविकास-पंचायतराज, नगरविकास, ऊर्जा, अर्थ, अन्न-नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार खाते, कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा, पशूसंगोपन, मत्स्योद्योग, कृषी, कामगार, बागायत, वाणिज्य-उद्योग या खात्यांना सूट देण्यात आली असून येथील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचारी उपस्थिती असावेत, असा आदेश देण्यात आला आहे.
मात्र, आवश्यकता भासल्यास कर्मचारी उपस्थितीची मर्यादा वाढविण्याचे अधिकार संबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांना असणार आहेत. याशिवाय सामाजिक अंतर, मास्कचा वापर करण्याची सक्ती असणार आहे. दिव्यांग, दृष्टीहिन, गर्भवती कर्मचाऱयांना कार्यालयातील उपस्थितीपासून सूट देण्यात आली आहे. हा आदेश 12 मे पर्यंत लागू असणार आहे.
सरकारी कर्मचाऱयांच्या बायोमेट्रीक हजेरीला स्थगिती

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकारी कार्यालयांमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱयांच्या बायोमेट्रीक हजेरी नोंदणीला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, हजेरी पुस्तिकेत स्वाक्षरी करून हजेरी नोंदविता येणार आहे.
कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा खात्याचे उपसचिव बी. एस. रवीकुमार यांनी मंगळवारी यासंबंधीचा आदेश दिला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट असून सर्व अधिकारी, कर्मचाऱयांच्या आरोग्याच्या दृष्टीने तत्काळ जारी होईल, अशा रितीने बायोमेट्रीक हजेरीपासून सूट देण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत बायोमेट्रीक हजेरी स्थगित राहणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बायोमेट्रीक हजेरीमुळे कोरोना संसर्गाचा धोका असल्याने पुढील आदेशापर्यंत बायोमेट्रीक मशिनवर हजेरी नोंदविण्यास स्थगिती देण्यात आली आहे. मागील वर्षी देखील असा आदेश देण्यात आला होता.









