प्रतिनिधी / भुईंज
सरकारने मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी वाई तालुका भारतीय जनता पार्टीचेवतिने आसले येथील भवानीमाता मंदिराजवळ आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरु आणि मंदिर बंद असे चित्र उभे केले आहे. राज्यातील प्रमुख धर्मादाय, विविध संप्रदायांचे साधुसंत, अनेक धार्मिक व आध्यात्मिक संघटना यांच्यातर्फे दि. 13 ऑक्टोबर रोजी मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीचा या उपोषणाला पाठिंबा असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभागी व्हावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी दिली.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, गेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडावेत याकरिता भाविकांनी अनेकवेळा मागणी केली. राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले, तरीही महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. उलट राज्यात मदिरेचे बार उघडण्यात आले अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या समन्वयातून मंगळवार दि. 13 ऑक्टोबर रोजी राज्यभर विविध ठिकाणी प्रमुख मंदिरांसमोर 11 वाजता लाक्षणिक उपोषण करण्यात आले. वाई मतदारसंघात भाजपचे निमंत्रित सदस्य माजी आमदार मदनदादा भोसले, भाजप जिल्हा अध्यक्ष श्री विक्रम पावसकर यांच्या सूचनेनुसार वाई तालुक्यातील भवानी माता मंदिर आसले येथे हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांचा उपोषणात सक्रीय सहभाग होता. त्यावेळी उपस्थित गजानन भोसले, सुरभी भोसले चव्हाण महिला मोर्चा अध्यक्ष, सचिन घाटगे जिल्हा सरचिटणीस भाजप, रोहिदास पिसाळ तालुका अध्यक्ष भाजप, यशवंत लेले, प्रशांत जाधवराव, मधुकर शिंदे, यशराज भोसले, विजयसिंह वाघ, नितीन विसापुरे, अर्चना नितीन विसापुरे, वर्षा सुनिल जंगम, सुरेश पवार, मनोज भोसले, हणमंत गायकवाड, अमोल भोसले, हेमंत भोसले आदी भाजपा पदाधिकारी यावेळी होते.









