प्रतिनिधी / सांगे
डॉ. प्रमोद सावंत सरकारने संजीवनी साखर कारखान्यासंदर्भात योग्य निर्णय घेतला असून ऊस शेतकऱयांचे हित सांभाळले आहे. यापूर्वी देखील भाजप सरकारने शेतकऱयांच्या हिताचेच निर्णय घेतलेले आहेत. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनीच ऊसाला आधारभूत रक्कम देण्यास सुरुवात केली होती. शेतकरी आत्मनिर्भर व्हावा हे भाजप सरकारचे धोरण आहे, असे सांगे भाजपो माजी अध्यक्ष व रिवणचे पंच सुरेश केपेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सरकारने संजीवनी कारखाना कृषी खात्याकडे वर्ग करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला. हा ऊस शेतकरी व संजीवनीच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय असल्याने शेतकऱयांनी त्याचे स्वागत केले आहे. स्व. पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतीला उत्तेजन दिले. शेतकऱयांवर अन्याय होऊ दिला नाही. बिकट परिस्थितीतही संजीवनी कारखाना चालविला. कृषी घर योजना पर्रीकरांनीच सुरू केली होती. सामान्य माणूस हा केंद्रस्थानी ठेवून भाजप सरकारने अनेक योजना सुरू केल्या. असे असताना विरोधक मुद्दामहून जनतेची दिशाभूल करत असतात, अशी टीका त्यांनी केली.
ऊस शेतकरी समाधानी
गेले अनेक दिवस संजीवनी कारखाना सरकार चालवणार की नाही यावरून उलटसुलट चर्चेला ऊत आला होता. आता मुख्यमंत्र्यांनी कारखाना बंद करणार नाही असे ऊस उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱयांना सांगितल्याने या विषयावर पडदा पडला आहे. त्याचबरोबर कारखाना उभा राहेपर्यंत ऊस शेतकऱयांचे हित जपले जाईल हे स्पष्ट केले आहे. याने ऊस शेतकरी समाधानी झाल्याचे ते म्हणाले.
भाजप सरकारने आजवर शेतकऱयांचे हित जपले असून यापुढेही रक्षण केले जाईल. शेतकऱयांनी अजिबात चिंता करण्याची गरज नसून कोणतेही आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्याकडे कृषी खाते असून कृषी उन्नतीसाठी ते उत्तम प्रकारे कार्य करत आहेत. ऊस शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष घातले आहे. कारखाना कृषी खात्याच्या ताब्यात आल्यानंतर ते त्याला संजीवनी प्राप्त करून देतील, अशी आशा केपेकर यांनी व्यक्त केली.
स्व. पर्रीकर यांचे सांगे मतदारसंघावर विशेष लक्ष होते. साळावली धरणाच्या पायथ्याशी साकारलेले बॉटनिक गार्डन हा प्रकल्प त्यांनीच सुरू केला होता. नेत्रावळी गाव आदर्श ग्राम म्हणून विकसित करण्याची संकल्पना ही देखील त्यांचीच होती. नेत्रावळी दूध ग्राम म्हणून पुढे आणण्याचा त्यांचाच विचार होता. सांगेच्या विकासासाठी त्यांनी भरीव असे योगदान दिले. पण काही प्रकल्प नंतरच्या काळात पुढे गेले नाहीत हेही नाकारता येत नाही, असे ते म्हणाले.









