तिलहर मतदारसंघातील रंजक लढत
उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूर जिल्हय़ातील तिलहरचे विद्यमान आमदार रोशनलाल वर्मा यांची सून असल्याचा दावा करणाऱया सरिता यादव यांनी याच मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. या मतदारसंघात दुसऱया टप्प्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
वर्मा यांनी अलिकडेच भाजपमधून बाहेर पडत समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यांना समाजवादी पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. वर्मा यांची सून सरिताने त्यांच्यावर लोकांची जमीन बळकाविण्याचा आरोप केला आहे. वर्मा यांनी तिलहर मतदारसंघातील अनेक लोकांच्या जमिनींवर अवैध कब्जा केला आहे. तसेच मोठय़ा संख्येत यादव आणि मुस्लीम समुदायांच्या लोकांवर बनावट गुन्हे नोंद करविले आहेत. तसेच माझे पती विनोद कुमार यांच्या नावावर नोंद जमिनीवरही वर्मा यांचा कब्जा असल्याचा आरोप सरिता यांनी केला आहे.
2019 मध्ये माझ्या पतीचा मृत्यू झाला होता आणि आपण 8 वर्षीय मुलीसोबत मतदारांशी संपर्क साधून मते मागत आहे. आमदार म्हणून निवडून आल्यास माझ्या सासऱयाकडून हडप करण्यात आलेली जमीन मुक्त करविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर वर्मा यांनी सरिता या आपली सून नसल्याचा दावा केला आहे. सरिता यांच्याकडे कुठलाच पुरावा नाही. त्यांच्याकडून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वर्मा म्हणाले. या मतदारसंघात सप उमेदवार वर्मा यांच्यासह भाजपच्या सलोना कुशवाह, काँग्रेसचे रजनीश गुप्ता आणि बसपचे फैजान अली निवडणूक लढवत आहेत.









